महापालिकेला वर्षभरात 2260 कोटी रुपयांचे उत्पन्न!

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेला 2016-17 या आर्थिक वर्षात विविध कर आणि महसुलद्वारे सुमारे 2 हजार 260 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यात एलबीटी 1 हजार 393 कोटी, मिळकत करातून 316 कोटी, बांधकाम परवानगीद्वारे 261 कोटी, पाणीपट्टी 32 कोटी अशा विविध स्त्रोतांचा समावेश आहे. मार्च एन्डींगमुळे महापालिका प्रशासनाने चालू आर्थिक वर्षातील कर वसुलीसह थकीत कराच्या वसुलीसाठी विशेष कर वसुली मोहीम राबवली होती. या मोहिमेमुळे महापालिकेच्या उत्पन्नात कमालीची भर पडली आहे.

विविध मार्गातून आले उत्पन्न असे
स्थानिक संस्था कर (एलबीटी)द्वारे 1 हजार 393 कोटी उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे. एलबीटीसाठी महापालिकेला राज्य शासनाकडून 1 हजार 350 कोटींचे मूळ उद्दिष्ट्य देण्यात आले होते. त्यानुसार, सुधारित अंदाज 1 हजार 390 कोटींचा होता. मात्र, प्रत्यक्षात एलबीटीद्वारे महापालिकेस 1 हजार 393 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मिळकत करातून महापालिकेस 316 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. महापालिकेला मिळकत करातून 400 कोटी रुपये अपेक्षित होते. मागील वर्षी 2015-16 मध्ये 411 कोटी रुपयांचा भरणा झाला होता. तर 2014-15 मध्ये 388 कोटी वसुली झाली होती. यावेळी ऑनलाईन भरणा 83 कोटी झाला. 16 विभागीय कार्यालयात भरणा स्वीकारला जात होता.

बांधकाम परवानगीतून महसूल
बांधकाम परवानगीद्वारे 261 कोटी रुपये उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक वसुली वाकडमधून (70 कोटी) झाली. रावेत 30 कोटी, रहाटणी 23 कोटी, पिंपळे गुरव 22 कोटी, पिंपरी 18.75 कोटी, थेरगाव 16.80 कोटी, मोशी-बोर्‍हाडेवाडी 25 कोटी, आकुर्डी 3.77 कोटी, सांगवीतून 55 लाख आणि बोपखेलमधून 51 लाख रुपये बांधकाम परवानगीतून मिळाले आहेत. तसेच, मुदत ठेव व्याज व इतर व्याजातून 45 कोटी, रस्ता दुरुस्ती व अनुदानातून 73 कोटी, नगररचना विभाग 81 कोटी, आकाश चिन्ह परवाना विभागातून 42 कोटी, भूमी आणि जिंदगी विभागातून 15 कोटी आणि इतर 47 कोटी अशा विविध करातून आणि महसुलद्वारे पिंपरी-चिंचवड महापालिकेला दोन हजार 260 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे.