येरवडा । देशातील महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवा कार्यकर्त्यांनी कार्य करण्याची गरज असल्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले. येरवडा येथील डॉन बास्को चर्च येथे भारतरत्न संत मदर तेरेसा यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त भारतीय रिपब्लिकन आघाडीच्या वतीने सर्पमित्रांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सुनीता वाडेकर, अनिल टिंगरे, उज्वला जंगले, इमरान मुजावर, संतोष कांबळे, सिरील आशीर्वादम आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
मदतीसाठी शासनाकडे प्रस्ताव
मदर तेरेसा यांनी समाजातील गोरगरीब व गरजू नागरिकांसाठी जी समाजसेविका केली आहे. ते शब्दातदेखील सांगणे कठीण आहे. आज साप अथवा नाग घरात शिरल्यावर अनेक जण या मुक्या प्राण्यांची विनाकारण हत्या करतात. मात्र काही जण सर्पमित्रांना याची माहिती देतात. अशा वेळेस सर्पमित्र जीवाची पर्वा ना करता विषारी नागांना सहजपणे पकडतात. या दरम्यान अनेकांना नागांनी दंश केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र शासनाकडून अशा सर्पमित्रांना कोणत्याही प्रकारे मानधन मिळत नसल्याची खंत धेंडे यांनी व्यक्त करून त्यासाठी आपण प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती धेंडे यांनी दिली.
सर्पमित्रांचा सत्कार
आजपर्यंत कोणत्याही संघटना, प्रतिष्ठान अथवा पक्षाच्या वतीने अशा सर्पमिंत्रांची दखल घेतली नाही. मात्र भारतीय रिपब्लिकन आघाडीच्या वतीने अशा सर्पमित्रांचा सत्कार केला. आघाडीने केलेले हे कार्य कौतुकास्पद असल्याचे उद्गार धेंडे यांनी काढले. यावेळी शहरासह राज्यातील विविध भागातील सर्पमित्रांना स्मृतिचन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन भारतीय रिपब्लिकन आघाडीचे संस्थापक व अध्यक्ष अमित उतार्यम यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रोहन जाधव व राकेश पाडळे यांनी मानले.