जळगाव। आज सहाव्या दिवशी शहरवासियांना महापालिकेद्वार जाहीर वेळापत्रकानुसार नियोजित पाणीपुरवठा न झाल्याने जळगाकरांमध्ये संताप निर्माण झाला आहे. याची दखल घेत महापौर व आयुक्त यांनी महावितरणच्या अधिकार्यांची भेट घेऊन समस्या सोडविण्याबाबत चर्चा केली. वादळ वार्यामुळे चिंचोली-उमाळा दरम्यान बाटलीवाला कारखानाजवळ दोन झाडे उन्मळून पडली. जळगाव विमानतळासमोर विद्युत तारांवर फांद्या पडल्या होत्या. तसेच औद्योगिक वसाहतीतील व्ही सेक्टरमध्ये झाड कोसळल्याने तारा तुटल्या. त्यामुळे क्युबिक बॉक्समध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. या सर्व प्रकारामुळे गेल्या पाच दिवसांपासून वाघुर धरणावरील पंपीग स्टेशनचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने जळगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. काल सकाळी वीज पुरवठा सुरु झाल्यानतंर महापालिकेने पाण्याचे वितरण सुरु केले होते. मात्र, पुन्हा रात्री 11 वाजता वीज खंडीत झाल्यामुळे टाक्या भरल्या न गेल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे.
पर्यायी फिडर द्या
महावितरणमुळे जळगावच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आज गुरुवारी महापौर नितिन लढ्ढा, आयुक्त जीवन सोनवणे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता साळुंखे व तडवी यांची भेट घेतली. त्यांना वाघुर येथील एक्सप्रेस फिडरच्या दुरुस्तीसाठी कायमस्वरुपी एक वाहन व पथकाची नियुक्ती करण्याची विनंती केली. तसेच वाघुर पपींग स्टेशनसाठी दुसर्या फिडरवरुन पर्यायी वीज जोडणी करण्याची मागणी केली. यावेळी माजी उपमहापौर सुनिल महाजन, नगरसेवक अनंत जोशी, शरद तायडे, पाणीपुरवठा अभियंता डि.एस. खडके, एस.एस.पाटील उपस्थित होते.
शहरातील 24 विहीरींची स्वच्छता करणार
पाण्याची समस्या निर्माण झाल्यावर नागरिकांचे हाल होवू नयेत यासाठी प्रशासन पावले उचलत असल्याची माहीती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली. यासाठी मुबलक पाणी असलेल्या शहरातील 24 विहरींची स्वच्छता करुन त्यावर मोटार पंप बसविण्यात येणार आहे. त्यावर 1 हजार लिटरची टाकी बसवून चार नळ लावण्यात येतील असेही आयुक्तांनी सांगीतले. येत्या सात दिवसात यासाठी निविदा काढणार असल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच जळगावातील सर्व बोअरवेल दुरुस्त करण्यात येतील तसेच ही यंत्रणा कायम सुरु राहण्यासाठी दरमहा आढावा घेण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.
शाहु नगरातील महिलांनी आणला हांडा मोर्चा
गेल्या सात ते आठ दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. याविरोधात नागरिकांमध्ये रोष पहावयास मिळत आहे. यातच मुस्लिम बांधवांचा पवित्र असा रमजान महिना सुरू असतांना नागरिक व रोजेदारांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याविरोधात अल्पसंख्यांक सेवा संघाच्या नेतृत्वात शाहू नगरातील महिलांना महापालिकेत हंडा मोर्चा आणला होता. आंदोलकांनी आयुक्तांची भेट घेऊन शहरातील पाणी पुरवठा त्वरीत सुरळीत करण्याची मागणी केली. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जहाँगीर खान, जिल्हा उपाध्यक्ष अकबर काकर, असिफ शेख, अनिस खान, फिरोज खान, सलोद्दीन बिहारी, तनवीर खाटीक, विकी राजपुत, अजय सोनवणे, गौरव चौधरी, साबेराबी, शबानाबी, सुलतानाबी आदी उपस्थित होते. यावर आयुक्तांनी महावितरणमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे सांगत शुक्रवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल असे सांगीतले.
सकाळी 9:30 वाजता वीजपुरवठा सुरळीत झाल्यावर पाण्याच्या टाक्या भरण्यास सुरुवात झाली आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत पाण्याच्या टाक्या भरल्यावर काल रोजी राहीलेल्या भागात पाणीपुरवठा करण्यात आला. आज ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता. त्या भागात उद्या शुक्रवारी पाणीपुरवठा होणार आहे.
आज या भागात पाणीपुरवठा
वाल्मिक नगर, कांचन नगर, दिनकर नगर, आसोदा रोड, रामेश्वर कॉलनी, एम. डी. एस कॉलनी, मास्टर कॉलनी, अक्सा नगर, अयोध्या नगर, शांतीनिकेतन, गृहकुल कॉलनी, म्हाडा कॉलनी, अजिंठा सोसायटी, मोहन नगर, नेहरू नगर, हरिविठ्ठल नगर, पिंप्राळा गावठाण परिसर, दांडेकर नगर, मानराज पार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी, द्रोपदी नगर, मुक्ताई नगर, धनश्री नगर, पोलिस कॉलनी, खोटे नगर, गेंदालाल मिल, शिवाजी नगर हुडको, प्रजापत नगर, एसएमआयटी परिसर, योगेश्वर नगर, हिरापाईप, शंकरराव नगर, खेडीगाव परिसर, तांबापूरा, शामाफायर, वाघ नगर, शिव कॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर, जिल्हारोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी, ऑफिसर क्लब या भागात आज (दि. 9) पाणीपुरवठा होणार आहे.
शनिवारी होणारा पाणी पुरवठा
खंडेराव नगर दुसरा दिवस – पिप्राळा गांवठाण उर्वरीत भाग, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबा नगर. मानराज टाकी दुसरा दिवस – शिंदेनगर, अष्टभुजा, वाटीकाआश्रम. खोटेनगर टाकीवरील राहिलेला भाग – निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी.नित्यांनद टाकी दुसरा दिवस – नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनी नगर, समतानगर परिसर.डीसीपी टाकी – सानेगुरूजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवराम नगर, यशवंत नगर. गिरणाटाकी आवारातील उंच टाकी, भगवान नगर, रामानंद नगर, कोल्हे नगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी, व इतर परिसर.गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी परिसर.
रविवारी होणारा पाणीपुरवठा
नटराज टाकी ते चौघुले मळा पर्यंतचा भाग, शनीपेठ, बळीराम पेठ, नवीपेठ, हौसिंग सोसायटी, शाहुनगर, प्रतापनगर. गेंदालाल मिल टाकीवरील भाग – खडकेचाळ, इंद्रप्रस्थ नगर, के.सी. पार्क, गेंदालाल मिल हुडको.रिंगरोड संपूर्ण – भोईटेनगर, भिकमचंद जैन नगर.आकाशवाणी टाकीवरील संपूर्ण भाग – जुनेगांव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ. हेमुकलाणी टाकी परिसर – गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी व इतर परिसर. सुप्रिम कॉलनी परिसर. डिएसपी टाकीवरून, पहिला दिवस – तांबापुरा, गणपती नगर, आदर्श नगर व इतर परिसर. 15 इंच व्हॉल – प्रभात कॉलनी, ब्रुकबाँड कॉलनी.
कृत्रिम पाणी टंचाई
शहरात गेल्या पाच दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उमाळा, वाघुर जलशुध्दीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना पाणीटंचाई सहन करावी लागली. पर्यायी वीज पुरवठ्याची सोय नसल्याने नागरिकांना सहा दिवसांनी पाणी मिळाले. वारंवार वीज खंडीत झाल्याने शहरातील पाण्याच्या टाक्या महापालिकेला भरता आली नव्हती. यातून कृत्रिम पाणीटंचाई सामना नागरिकांना करावा लागला.