महापौरांच्या प्रभागातच काही ठिकाणी अस्वच्छता

0

बळीरामपेठेत हॉकर्सचे अतिक्रमण

जळगाव: प्रभाग क्रमांक 4 मधील काही भागात सुविधा नसल्यामुळे नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. गटारी असूनही सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे दिसून आले.चौघुले प्लॉट परिसरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.सार्वजनिक शौचालयाची स्थिती अतिशय बिकट आहे.काही भागात मुलभूत सुविधा तर काही भागात सुविधांची वानवा असल्याचे दिसून आले.विशेषत: या प्रभागातील बाजारपेठेत अतिक्रमण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मनपाने कोट्यावधी रुपये खर्च करुन पाच वर्षासाठी साफसफाईचा एकमुस्त ठेका दिला आहे. मात्र महापौरांच्या प्रभागातच काही ठिकाणी अस्वच्छता दिसून आली. काही महिन्यापूर्वी वॉटरग्रेसचे काम बंद केल्यानंतर सफाईसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी महापौर भारती सोनवणे आणि त्यांचे पती नगरसेवक कैलास सोनवणे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यावेळी दैनंदिन सफाई केली जात होती.मात्र आता वॉटरग्रेसचे काम सुरु झाले आणि पून्हा तीच परिस्थिती सफाईची झाली आहे. महापौरांच्या प्रभागात स्वच्छतेची स्थिती बिकट असेल तर शहरातील अन्य प्रभागाची स्थिती विचारायलाच नको असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रभाग क्रमांक 4 संमिश्र वस्तीचा परिसर आहे. या प्रभागात शनिपेठ,दालफळ,चौघुले प्लॉट,ओक मंगल कार्यालय परिसर, बळीराम पेठ, नानकनगर, जोशीपेठ,मारोती पेठ, बालाजी पेठ,रामपेठ, विठ्ठलपेठ, रथ चौक,बागवान गल्ली,भावसार मढी या परिसराचा समावेश आहे. या प्रभागात समस्या, जाणून घेण्याचा प्रयत्न केला.दरम्यान,प्रभागात काही भागात विकासकामे दिसून आलीत.तर काही भागात विकासकांचा अभाव असल्याचे दिसून आले. किमान मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चौघुले प्लॉटमधील रस्त्यांची दूरवस्था
प्रभाग क्रमांक 4 मधील चौघुले प्लॉटमध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली असल्याचे चित्र दिसून आले.तसेच काही ठिकाणी असलेल्या गटारी जीर्ण झाल्याने गटारीतील सांडपाणी रस्त्यांवर वाहत होते. गटारींची सफाई होत नसल्याने अक्षरश: तुंबलेल्या दिसून आल्या आहेत. साफसफाईची तर कायमच ओरड आहेे. येथील नगरसेवक दखल घेतात मात्र मनपा प्रशासनाकडून फारसे सहकार्य मिळत नाही.वारंवार तक्रारी करुनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा सूर नागरिकांच्या बोलण्यातून उमटला.

बाजारपेठेत अतिक्रमण
प्रभाग क्रमांक 4 मधील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याचे दिसून आले. बळीरामपेठेत भाजीपाला विक्रेत्यांमुळे अतिक्रमण होत आहे.त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने या ठिकाणी दररोज वाहतुकीची कोंडी होते.तसेच सांयकाळी भाजीपाला विक्रेते,फळ विक्रेते खराब असलेला माल त्याच ठिकाणी रस्स्यावर टाकून देत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरते.परिणामी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उपायुक्त संतोष वाहुळे यांनी कारवाईची मोहीम सुरु केली आहे. वारंवार सूचना देवूनही अतिक्रमणाची स्थिती कायम आहे.

वॉटरग्रेसचे काम असमाधानकारक
शहरातील साफसफाईसाठी मनपा प्रशासनाने पाच वर्षासाठी एकमुस्त ठेका दिला आहे. मात्र शहरात सफाई होत नसल्याने सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांची देखील ओरड असते. काही महिन्यापूर्वी वॉटरग्रेसचे काम बंद करण्यात आले होते. त्यावेळी पर्यायी व्यवस्था करुन शहरात समाधानकारक सफाई केली जात होती. मात्र आता पून्हा वॉटरग्रेसचे काम सुरु झाले आहे. सफाईचे काम समाधानकारक नसल्याने नागरिकांची ओरड आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे.

पावसाळा नसतांनाही साचलेल्या पाण्यातून उपमहापौरांची वारी
अनेक वसाहतींत पक्क्या गटारी नसल्याने सांडपाणी साचून, पावसाळा नसतांनाही सखल भागातील रिकाम्या प्लॉट जागांत लहान मोठी तळी साचलेली आहेत. जुना आसोदा रोड भागातील शंकर आप्पा नगर आदी वसाहतींत ही स्थिती उपमहापौरांना आजच्या वार्ड दौ-यात पाहायाला मिळाली. साचलेल्या तळयांमध्ये साधारण 6 फुट इतक्या उंचीचे पाण गवत उगवलेले आहे. शिवाय कृमि किटक तयार होऊन रोगराईचा धोका निर्माण झालेला आहे.


उपमहापौर आपल्या दारी अभियानातर्गत उपमहापौर सुनील खडके हे विविध मनपा पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक, आणि संबधित वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत दररोज निरनिराळया प्रभागांचा धावता दौरा करित आहेत. बुधवारी प्रभाग क्रमांक 3 च्या जूना आसोदा रोड, शंकर आप्पा नगर, योगेश्वर नगर, मुरलीधर नगर, कमल लॉन परिसर, गजानन पार्क बजरंग कॉलनी, गिताई नगर, देवपुंजी नगर स्वप्नशिल अपार्टमेंन्ट परिसर या भागांना भेटी देण्यात आल्या. कच्चे रस्ते , पक्क्या गटारींचा अभाव, स्ट्रीट लाईट अभावी रात्री पसरणारा अंधार, डासांचा उपद्रव आदी समस्यांकडे लोकांनी उपमहापौरांचे लक्ष वेधले.

शंकरराव नगर देवपुर्ती नगर आदी भागात पक्या गटारी बांधण्याची मागणी करण्यात आली काही ठिकाणी चार्‍या देखील खोदलेल्या नुसन रहिवाश्यांना स्वत:च खोदुन घ्याव्या लागेल्या आहेत. रस्ते दिवाबत्ती गटारी यांबाबत सर्वच ठिकाणी समस्या मांडण्यात आल्या, स्ट्रीट लाईट नसल्याने रात्री अंधारात चोरांसह विंचु काटयाची भिती आहे. पावसाळयात मोठया प्रमाणावर रस्त्यांवर चिखल निर्माण होत असतो. गिताई नगरातही सांडपाण्यामुळे खाजगी प्लॉट जागेत डबकी साचलेली आहेत. देवपुर्ती नगर इत्यादी भागात डबक्यात पुरुषभर उंचीचे पानगवत उगवलेले आहे. बजरंग कॉलनीत रहीवाश्यांचा वहीवाटीचा रस्ता बंद झालेला असुन, या समस्येतुन त्वरीत मार्ग काढण्याची मागणी करण्यात आली. गोपाळपुरा लगत नाल्यावर असलेल्या पुलावर व परिसरात स्ट्रीट लाईट नाही त्यामुळे पुल ओलांडतांना लहान मोठे अपघात होत असतात याकडे लक्ष वेधण्यात आले.

महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, विधी समिती सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, स्वच्छता समिती सभापती चेतन सनकत, नगरसेविका गायत्री राणे, दिपमाला काळे, मिनाक्षी पाटील यांच्यासह स्थानिक नगरसेवक प्रविण कोल्हे, शहर अभियंता अरविंद भोसले, पाणी पुरवठा अभियंता सुशिल साळुंखे, प्रभाग अधिकारी उदय पाटील, प्रकल्प अभियंता योगेश बोरोले, नगररचना सहाय्यक सुहास चौधरी, विद्युत विभाग प्रमुख एस एस पाटील, शाखा अभियंता जितेंद्र रंधे, मंजूर खान, संजय पाटील, सुनिल तायडे, किरण मोरे, मुख्य स्वच्छता निरिक्षक बडगुजर, स्वच्छता निरिक्षक लोखंडे, कमलाकर पाटील उपस्थित होते.