महापौर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा मार्टिन, फारुख संयुक्त आघाडीवर

0

मुंबई । प्रथम मानांकित युक्रेनचा ग्रँडमास्टर क्रवत्सीव मार्टिन व तृतीय मानांकित ताजिकिस्तानचा ग्रँडमास्टर अमानातोव्ह फारुख यांनी सातव्या फेरीअखेर साखळी 6 गुणांची नोंद करून मुंबई महापौर चषक एलआयसी पुरस्कृत आंतरराष्ट्रीय खुल्या अ गट बुध्दिबळ स्पर्धेत संयुक्त पहिल्या स्थानाची आघाडी घेतली आहे. ग्रँडमास्टर क्रवत्सीव मार्टिनने बिगरमानांकित भारताच्या राहुल व्ही.एस.चा (इलो 2233) 30 चालीमध्ये तर ग्रँडमास्टर अमानातोव्ह फारुखने भारताच्या फिडे मास्टर एरीगीसी अर्जुनचा 51 चालीमध्ये पराभव केला. बिगरमानांकित सम्मेद जयकुमार शेटेने सहावा मानांकित भारताचा ग्रँडमास्टर संदीपन चंदाला (4.5 गुण) चकवून 5.5 गुणांसह चौथा मानांकित रशियाचा ग्रँडमास्टर रोझुम इवान, अकरावा मानांकित भारताचा ग्रँडमास्टर दिप्तायण घोष, भारताचा फिडे मास्टर राजा रीथ्विकन, भारताचा आयएम विक्रमादित्य कुलकर्णी आदी 14 बुध्दिबळपटूच्या संयुक्त द्वितीय क्रमांकाच्या आघाडीत स्थान मिळविले.

महापौर चषक आंतरराष्ट्रीय अ गट बुध्दिबळ स्पर्धेमधील पहिल्या पटावर ग्रँडमास्टर क्रवत्सीव मार्टिनविरुद्ध खेळताना राहुल व्ही.एस.याने भारतीय बचाव पध्दतीचा अवलंब केला. राजाच्या बाजूकडील प्याद्याने उंटावर हल्ला चढविल्यामुळे राहुलचा राजा अडचणीत आला. मुत्सदी मार्टिनने हत्तीचा बळी देत राहुलच्या राजावर जोरदार हल्ला चढवत वजीर मिळविला आणि 30 व्या चालीला विजय प्राप्त केला. दुसर्‍या पटावर ग्रँडमास्टर अमानातोव्ह फारुख विरुद्ध फिडे मास्टर एरीगीसी अर्जुन यामधील लढत पेट्रोफ डिफेन्स पद्धतीने सुरू झाली. 20 व्या चालीत हत्तीच्या अदलाबदलीमध्ये फारुखला एक प्यादा मिळविता आला. नंतर मोहरांची अदलाबदल झाल्यावर फारुखकडे दोन उंट विरुद्ध घोडा आणि उंट अशी काहीशी बळकट स्थिती निर्माण करता आली. त्याचा लाभ उठवत फारुखने 51 व्या चालीला विजयासह सहावा साखळी गुण नोंदवला. भारताचा ग्रँडमास्टर संदीपन चंदाला पराभव पत्करावा लागल्यामुळे तो संयुक्त चौथ्या स्थानावर गेला आहे. त्याच्या विजेतेपदाच्या आशा काहीशा धूसर झाल्या आहेत.