पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या महासभेपुढे सत्ताधारी नगरसेवकांनी विचारलेले प्रश्न महापौर राहूल जाधव यांनी स्विकारले नाहीत, अशी खंत नगरसेवक तुषार कामठे यांनी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातील एका प्रशिक्षण देणार्या संस्थाबाबत कामठे यांनी प्रश्न उपस्थित केले होते. तसेच ते प्रश्न महासभेकडे देवून त्यांची उत्तरे देण्याची मागणी केली होती. परंतू, महापौर राहूल जाधव यांनी ते प्रश्न विचारले नसल्याचे तुषार कामठे यांनी म्हटले आहे.
हे देखील वाचा
भाजपचे नगरसेवक कामठे यांनी महापालिकेतील नागरवस्ती विकास योजना विभागातील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशिक्षण संस्थाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ही संस्था महिलांसाठी प्रशिक्षण देण्याचे काम करते. या संस्थेने आतापर्यंत किती महिला प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. महापालिकेचा अशा प्रकारच्या प्रशिक्षण घेण्यामागचा उद्देश काय?, या संस्थेकडून प्रशिक्षण घेऊन किती महिलांनी स्वयंरोजगार सुरु केला? किती महिला उद्योजिका तयार झाल्या? या संस्थेला काळ्या यादीत टाकल्यानंतरही पुन्हा कार्यान्वित करण्यामागचा हेतू व कारणे स्पष्ट करा. दरम्यान, महापालिकेने आजपर्यंत अशा प्रकारच्या प्रशिक्षणावर किती खर्च केला. त्याचा तपशील देण्यात यावा, असे प्रश्न कामठे यांनी विचारले होते. हे प्रश्न डिसेंबर महिन्याच्या महासभेत घेण्याची विनंती त्यांनी महापौर जाधव यांच्याकडे केली होती. परंतु, महापौर राहुल जाधव यांनी ते प्रश्न स्वीकारले नाहीत. त्यामुळे भाजप नगरसेवकांनाच उत्तर मिळत नाहीत, अशी परिस्थिती महापालिकेत निर्माण झाली आहे.