मुंबई : कोणतीही शासकीय जागा ही स्मारकासाठी दिली जाऊ नये असा सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना महापौर बंगल्यात स्मारक बांधण्याचा घाट घातला जात असून महापौर पदाची चेष्टा केली जात आहे असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. एवढंच नाही तर महापौर बंगला जिमखान्याजवळ होऊ देणार नाही. जिमखाना हा खेळण्यासाठी आहे महापौर बंगल्यासाठी नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी भूखंड मिळू नये यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही.असही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. आज त्यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली आणि त्यानंतर महापालिकेवर आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
आयुक्तांच्या भेटीमध्ये त्यांनी महापौर निवासाच्या जागेवर बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक बांधण्यास विरोध दर्शवला. मुंबई हे जगातल्या चार पाच शहरांपैकी एक शहर मानलं जातं. या शहराच्या महापौरांना राहण्यासाठी जागा मिळू नये? त्यासाठी त्यांना वणवण करावी लागते? यासारखी थट्टा नाही. शिवसेनेने महापौरपद आणि महापौरांची चेष्टा केली आहे असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
राज ठाकरेंनी रेल्वे स्टेशनजवळ बसणाऱ्या फेरीवाल्यांचाही मुद्दा आयुक्तांना पुन्हा सांगितल्याचे स्पष्ट केले. मनसेने आंदोलन केल्यावर काही दिवस फेरीवाले लांब बसले होते आता महापालिकेच्या लाचखाऊ अधिकाऱ्यांमुळे पुन्हा फेरीवाले दीडशे मीटरच्या आत बसू लागले आहेत. रेल्वे स्टेशन परिसराच्या दीडशे मीटर अंतरापर्यंत फेरीवाले बसू नयेत हा कोर्टाचा आदेश आहे. मात्र महापालिकेचे लाचखाऊ आणि निक्कमे अधिकारी त्याचाही अवमान करत आहेत असाही आरोप राज ठाकरेंनी केला.