महापौर म्हणतात, प्रत्युत्तर देऊन कोणाला मोठे करणार नाही!

0

महिला शहराध्यक्षा शैला मोळक यांनी चर्‍होलीतील समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडे केला होता पत्रव्यवहार
सत्तारुढांमधील अंतर्गत कुरघोड्याचे राजकारण चव्हाट्यावर

पिंपरी-चिंचवड : महापौर नितीन काळजे यांच्या चर्‍होली प्रभागात समस्यांचा ‘सुकाळ’ असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी भाजपच्याच महिला शहराध्यक्षा शैला मोळक यांच्याकडे केली. त्यानंतर मोळक यांच्यामार्फत नागरिकांनी आयुक्तांची भेट घेतली. परंतु, दखल न घेतल्यामुळे मोळक यांनी मुख्यमंत्र्यांसह, महसूलमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून त्यांचे याकडे लक्ष वेधले होते. याबाबत विचारले असता महापौर म्हणाले, मी केलेले काम जनतेला माहिती असून प्रत्युत्तर देऊन कोणाला मोठे करणार नाही.

थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार
काळजे हे प्रभाग क्रमांक तीन चर्‍होली, मोशी गावठाणातून निवडून आले आहेत. त्यांना भाजपचा पहिला महापौर होण्याचा मान मिळाला. त्यांची नुकतीच महापौरपदाची वर्षपूर्ती झाली. वर्षभरात चर्‍होलीचा विकास करण्यावर भर दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी महापौरांच्या प्रभागात समस्यांचा ‘सुकाळ’ असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी मोळक यांच्याकडे केल्या. मोळक यांनीही नागरिकांच्या ‘हाकेला’ साथ देत पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु केला. पालिकेत प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांसह, महसूलमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून त्यांचे चर्‍होलीतील समस्यांकडे लक्ष वेधले आहे. याप्रकरणावरुन भाजपमधील अंतर्गत कुरघोड्याचे राजकारण पुढे आले आहे.

वादाला पालिका निवडणुकीची किनार
दरम्यान, फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत निष्ठावान असून देखील नेत्यांच्या विरोधामुळे शैला मोळक यांना भाजपच्या उमेदवारीसाठी झगडावे लागले होते. चर्‍होली, मोशी प्रभागातून त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. चर्‍होलीतील भाजपच्या चिन्हावर महापौरांसह तिघे निवडून आले. परंतु, मोळक यांचा पराभव झाला. भाजपच्या पॅनेलमध्ये त्यांना सहभागी देखील करुन घेतले नव्हते. तेव्हापासून महापौर आणि महिला शहराध्यक्षा यांच्यामध्ये राजकीय ’द्वंद्व’ आहे.

मी काम करतो की नाही, हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे कोणी तक्रारी केल्यामुळे फरक पडत नाही. कोणाच्या तक्रारीला उत्तर देऊन मी कोणाला मोठे करणार नाही
-नितीन काळजे, महापौर