सव्वा पाच लाख रुपये खर्च मंजूर
पिंपरी-चिंचवड : महापौर नितीन काळजे सोमवारी (दि.13) युरोपमधील स्पेन देशाच्या दौर्यावर जाणार आहेत. यामध्ये महापौर काळजे विविध प्रकल्पांची माहिती घेणार असून 21 नोव्हेंबरला ते दौर्यावरुन परततील. या दौर्यासाठी येणार्या पाच लाख 22 हजार रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता देखील दिली आहे. बार्सिलोना शहरात 14 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत ’स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड काँग्रेस 2017’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित देशांमधील स्मार्ट सिटीअंतर्गत केलेले पायाभूत सुविधांचे नियोजन, विकासकामे, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण, वेगवान दळणवळण आणि परिवहन यंत्रणांचे प्रदर्शन व प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत. या परिषदेसाठी महापौर नितीन काळजे येत्या सोमवारी (दि.13) जाणार आहेत. आठ दिवसानंतर महापौर शहरामध्ये परत येणार आहेत.
20 ला सर्वसाधारण सभा
दरम्यान, 20 नोव्हेंबर रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा आहे. या सभेला महापौर हजर राहू शकणार नाहीत. 21 नोव्हेंबर रोजी महापौर काळजे शहरात येणार आहेत. तर, उपमहापौर शैलजा मोरे या देखील तीन दिवस खासगी कामासाठी शहराबाहेर असणार आहेत. त्यामुळे 20 नोव्हेंबर रोजी होणा-या महासभेचे अध्यक्षस्थान भूषवण्याची संधी कोणाला मिळते, याबाबतही उत्सुकता लागली आहे. तसेच सत्ताधारी महापौर, उपमहापौरांच्या अनुपस्थितीत सभा चालवतात की तहकूब करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.