महामार्गाच्या चौपदरीकरणात जिल्हाधिकार्‍यांचा खोडा

0

नवी मुंबई । पळस्पे ते इंदापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात सुरू असलेल्या दिरंगाईचे जिल्हाधिकारी आणि भूसंपादन अधिकार्‍यांना अजिबात गांभीर्य वाटत नाही. अनेक ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया रखडली असल्याने महामार्गाचे काम गती घेण्यास तयार नाही.

त्यातच पाऊस आणि अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे महामार्ग अंतिम संस्काराच्या प्रतिक्षेत आहे. तरीदेखील जिल्हाधिकारी तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याचे सांगत पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्षांंनी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या मानसिकतेवर प्रश्‍न उपस्थित केला आहे. तसे खरमरीत पत्र सूर्यवंशी यांना ईमेलद्वारे पाठवले आहे. गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी संपर्क साधून मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे- इंदापूर महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणाबाबत ठोस निर्णय घेण्याची आग्रही भूमिका विषद केली. आपणही त्या मार्गावरून परवाच अलिबागला आलो, असे सांगत महामार्गाच्या दुरवस्थेबाबत कबुली देत बैठक बोलावण्याची ग्वाही सूर्यवंशी यांनी कडू यांना दिली. त्यानुसार संघर्ष समितीने सहा मागण्यांचे निवेदन तात्काळ जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांना त्यांच्या शासकीय ई-मेलवरून पाठवून दिले.