भुसावळ। राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणास अजूनही मुहुर्त सापडलेला नाही. मात्र, या कामाला सुरुवात होण्याच्या चार वर्षे अगोदर महामार्गाच्या दोन्ही बाजूची डेरेदार झाडे तोडण्याची घाई करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी प्रा. धीरज पाटील यांनी दिल्लीतील केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.
भूसंपादन निविदांच्या तांत्रिक घोळात महामार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे. तत्पूर्वी, चौपदरीकरणासाठी लागणारी जमीन अधिग्रहित होण्यापूर्वीच वरणगाव ते भुसावळ आणि पुढे जळगावपर्यंत महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या झाडांवर कुर्हाडी चालल्या. यामुळे पर्यावरणाची हानी झाली असून मार्च ते एप्रिल महिन्यातच तापमान 41 अंशांपर्यंत गेले आहे. तापमानात सावलीसाठी एकही झाड नसलेल्या महामार्गावरून प्रवास करणे सर्वांसाठी त्रासदायक ठरते. त्यामुळे मुळातच चौपदरीकरणाच्या कामाची सुरुवात वृक्षतोडीपासून करणे चुकीचे होते, याकडे प्रा.पाटील यांनी लक्ष वेधले आहे.