महामार्गावरील झाडे गेली बागेत राहायला

0

मेट्रो मार्गातील 171 झाडांचे पुनर्रोपण

पिंपरी : एखादे रोपटे ज्या ठिकाणी उगवते त्याच ठिकाणी त्याचे झाडात आणि मोठ्या वृक्षात रूपांतर होते. त्याच ठिकाणी ते म्हातारे होते आणि वठून जाते. स्थलांतर नावाचा प्रकार त्याच्या नशिबात कधीच नसतो. पण आता आधुनिक पद्धतीने झाडांचे पुनर्रोपण करण्यात येत आहे. त्यामध्ये झाडांना एका जागेवरून यशस्वीरीत्या दुसर्‍या जागी लावण्यात येत आहे. पुणे मेट्रोच्यावतीने मेट्रो मार्गात येणार्‍या तब्बल 171 झाडांचे यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले आहे.

पुणे मेट्रोचे काम वेगात सुरु आहे. जमिनीच्या अधिग्रहणापासून ते खांबांचा पाया, खांब बांधणी, पिलर कॅप बसविणे, पॅन सेगमेंट अशा विविध पातळ्यांवरील काम पिंपरी ते दापोडी दरम्यान ठिकठिकाणी सुरु आहे. या मेट्रो मार्गासाठी काही झाडे आडवी येत आहेत. आडव्या येणार्‍या सर्व झाडांना कुर्‍हाड न लावता त्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय पुणे मेट्रोने घेतला आहे. मागील दोन महिन्यांपासून तब्बल 171 झाडे पुणे-मुंबई महामार्गावरून स्थलांतरित करण्यात आली आहेत. त्यातील 68 झाडे पिंपरी येथील गुलाब रोपवाटिका येथे लावण्यात आली आहेत. 8 झाडे वल्लभ नगर मेट्रो सहयोग केंद्रात लावण्यात आली. तर उर्वरित 95 झाडे कासारवाडी येथील मेल जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ लावण्यात आली आहेत.

पुणे-मुंबई महामार्गावरील आणखी 20 झाडांचे बुंधे बांधून ठेवण्यात आले आहेत. त्यांचेही येत्या काही दिवसात पुनर्रोपण करण्यात येणार आहे. जी झाडे मेट्रो मार्गात येत आहेत, मात्र त्या झाडांचा मेट्रोच्या कामामध्ये काहीही अडथळा येत नसेल तर त्या झाडांना स्थलांतरित करण्यात येणार नाही. केवळ मेट्रोच्या कामामध्ये येणारी झाडेच हलविण्यात येत आहेत. वाढते प्रदूषण आणि झाडांची गरज यांचा मेळ साधत हा उपाय करण्यात आला आहे. यामुळे झाडांना देखील एका जागेवरून दुसर्‍या जागी गेल्याचा आनंद मिळणार आहे.