देहूरोड : महामार्गावरील दारूविक्री बंदची अंमलबजावणी झाल्यामुळे देहूरोड परिसरातील जवळपास सर्वच दारूविक्री दुकाने आणि बार बंद झाले आहेत. या बंदीचा व्यवसायिकांना जबरदस्त फटका बसल्याचे चित्र असले तरी फिक्स गिर्हाईक अशी ओळख असलेल्या तळीरामांवर मात्र, या बंदीचा फारसा प्रभाव दिसत नाही. पाच-सहा किलोमीटरची पायपीट करून ही मंडळी आपली तहान भागविताना दिसत आहेत.
या भागातील तेरा दारू विक्री केंद्रे बंद
महामार्गावर किंवा महामार्गापासून पाचशे मीटर अंतरातील दारूविक्री बंदीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर 1 एप्रिलपासून त्याची कडक अंमलबजावणी झाली आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील निगडी परिसरातील चार बार, देहूरोड येथील दोन विदेशी दारू दुकाने, एक देशी दारू दुकान व बियरशॉपी, पाच बार, किवळे येथील दोन बार, शंकरवाडी येथील तीन बार, अशी जवळपास तेरा विक्री केंद्रे बंद झाली आहेत. केवळ महामार्गाजवळील दारूविक्रेत्यांवर कारवाई करुन अन्याय केला जातोय. प्रबळ लोकशाही असलेल्या आपल्या देशात सर्वांना समान न्याय असताना या भूमिकेत पक्षपात का केला जातोय? असा सवाल करीत दारू व्यवसायिक आगपाखड क रताना दिसत आहेत.
लॉजमध्येच गिर्हाईकांना सेवा
काही ठिकाणी हेच चित्र जरा वेगळे दिसून येते. काही बारचालकांनी हॉटेलवरील लॉजमध्येच गिर्हाईकांना सेवा पुरविण्याची नामी शक्कल शोधली आहे. ग्राहकाला लॉजमधील खोली उपलब्ध करून दिली जाते. त्यानंतर ऑर्डरनुसार दारू उपलब्ध करून दिली जाते, अशी माहिती मिळाली आहे. मात्र, दारूला रोज तोंडी लावणार्या तळीरामांवर या बंदीचा फारसा परिणाम दिसून येत नाही. दारूसाठी वाट्टेल ते करणार्या या लोकांनी पाच-सहा किलोमीटर जाऊन तेथुन आपली हौस भागविण्यास सुरुवात केली आहे. रावेत-वाल्हेकरवाडी रस्त्यावरील एका दारू विक्री दुकानावर त्यामुळे मोठा ताण वाढला आहे. दिवसभर या दुकानासमोर प्रचंड गर्दी दिसू लागली असून रात्री तर या ठिकाणी जत्रेचे स्वरूप पाहायला मिळत आहे.