महामार्गावर अवजड वाहनांची गर्दी

0

शहादा। शहादा शिरपूर रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून अनेकदा मागणी होवूनही रस्त्यांकडे संबंधीत अधिकार्यांचे दुर्लक्ष का होते? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. अंकलेश्वर ब्रहाणपूर या महामार्गावर दिवसभर अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते.त्यामुळे रस्त्यात पडलेले खड्डे व वडाळी,बामखेडा,ते नवीहिंगणी सर्वच रस्त्यांची दुरावस्था झालेली असून रस्त्यावर चारचाकी तर सोडा दुचाकी वाहन चालविणे देखील कठीण झाले आहे. रस्त्यावर पडलेल्या लहान मोठ्या खड्ड्यांमुळे अनेकवेळा अपघात होवून जिवीत हानी झाली आहे.

खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नामुळे अपघात
गेल्या काही दिवसापुर्वी याच शहादा शिरपुर रस्त्यावर हिंगणी गावाजवळील भोंडण नाल्याचा पुलाला मोटार सायकल ठोकली गेल्यामुळे दोन जणाचा जागीच मुत्यु झाला आहे.तसेच खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नामुळे वाहने एकमेकांवर आदळतात तर वाहन खड्ड्यात पडल्याने वाहनाचे देखील नुकसान होऊन वाहनधारकास आर्थिक नुकसान सहन करावे लागते.या रस्त्यावर असे लहान-मोठे अपघात घडण्याची मालीका सुरू असतांना देखील लोकप्रतिनिधी व संबंधी विभागाचे अधिकारी, कर्मचारी याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत.

कठडे नसल्याने पुल धोकादायक
नेहमी महामार्गावरील बामखेडा ,वडाळी, तोरखेडा फाटा, फेस फाटा हिगंणी या गावांजवळ खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नामुळे लहान मोठे अपघात नेहमी होत असतात. तसेच शहादा शिरपुर रस्त्यावरील पुलांना संरक्षण कठडे नसल्याने वाहन चालकांना पुल धोकेदायक ठरत आहे. या रस्त्यावरील पुलाचे संरक्षण कठडे गेले तरी कुठे याचा मात्र कोणीच तपास करीत नाही का ? संबंधित विभागाला या संरक्षण कठडे नसलेल्या पुलांची अवस्था दिसत नाही का? अस प्रश्न जनमानसातून केला जात आहे.

अपघातामुळे रहदारी अनेक तास ठप्प
अपघातामुळे महामार्गावरील रहदारी अनेकतास ठप्प होत असते. अपघाती घटना घडल्यानंतर त्याचे सर्वांना दु:ख होते. मात्र त्यावर कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. फक्त आश्‍वासन देवून वेळ चुकविली जाते. पुन्हा येरे माझ्या मागल्या या उक्तीप्रमाणे अपघाताची मालीका सुरूच असते. तरी आतातरी या दुर्दैवी घटनेकडे दुर्लक्ष न करता शहादा शिरपूर मार्गावरील कुकावल , कोठली, वडाळी, बामखेडा आदि गावाजवळील रस्ते दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.