आयटीआयजवळ अपघात ; दोन वर्षापूर्वीच मिळाली होती नोकरीत बढती
जळगाव- मित्राला शिवकॉलनी येथे सोडून घराकडे परतत असताना समोरुन येणार्या कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत अविनाश बापू पाटील (वय 30 मूळ रा. मोहाडी, धुळे, ह.मू अयोध्यानगर) महावितरण कंपनीच्या विद्युत सहाय्यकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री 12.30 वाजता आयटीआयजवळ घडली. दोन वर्षापूर्वीच अविनाशला नोकरीत बढती मिळाल्याने तो विद्युत सहाय्यक झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
मूळ पाचोरा तालुक्यातील रहिवासी येथील अविनाश पाटील हा कुटुंबियांसह रोजगाराच्या निमित्ताने धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथे स्थायिक झाले आहे. आई, वडील, एक अविवाहीत बहिण असा परिवार आहे. अविनाश पाटील हा एमआयडीसी परिसरातील एमआयडी दक्ष 1 या ठिकाणी विद्युत सहाय्यक म्हणून कार्यरत होता. अयोध्यानगर परिसरात भाडे करारावर खोली करुन राहत होता. मंगळवारी ड्युटी आटोपल्यावर अविनाश हा त्याच्या दुचाकीने (एम.एच 19 ए. जे. 7710) ने त्याच्या मित्राला सोडण्यासाठी शिवकॉलनीकडे गेला होता. तेथून अयोध्यानगरमधील खोलीकडे परतत असतांना 12.30 वाजेच्या सुमारास असताना आयटीआयसमोर समोरुन समोरुन येणार्या कार (एम.एच 19 सी.यु. 8921) ने अविनाशच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. रस्त्यावर पडून तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अविनाशचा जागीच मृत्यू झाला.
खाकी कपडे, डिक्कीतील ओळखपत्रावरुन
अपघातानंतर घटनास्थळी महामार्गावर ये-जा करणार्या वाहनधारकांसह नागरिकांची गर्दी झाली. यावेळी याच ठिकाणाहून मेहरुण दक्ष या ठिकाणी कार्यरत महावितरणचे कर्मचारी सागर राजपूत जात होते. गर्दी असल्याने ते घटनास्थळी गेले. मयताच्या अंगावर खाकी कपडे, त्यावर महावितरण लोगो होता. यानंतर दुचाकीची डिक्की उघडून बघितले असता, त्यात ओळखपत्र होते. त्यावरुन मयत महावितरणचा कर्मचारी असल्याने समजले. यानंतर सागर राजपूत यांनी ओळखपत्राचा फोटो महावितरण कर्मचार्याच्या व्हॉटस्अॅप गृपवर व्हायरल केला. त्यावरुन ओळख पटली व अविनाशच्या कुटुंबियांना संपर्क केल्यावर कर्मचार्यांनी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. यानंतर मृतदेह अत्यंसंस्कारासाठी धुळे मोहाडी येथे हलविलण्यात आला.
दोन वर्षापूर्वीच मिळाली बढती
अविनाश या महावितरण कंपनीत नोकरीला असता 17 मे 2017 रोजी विद्युत सहाय्यक पदावर बढती मिळाली होती. अविनाशचे वडील रिक्षा चालवून उदरनिर्वाह भागवितात. बहिणी अविवाहीत एकुलत्या कर्त्या मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांनी आक्रोश केला. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरुन रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास हेड कॉन्स्टेबल विनोद शिंदे करीत आहेत. अपघातग्रस्त कार तसेच दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.