खोटे नगरजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला उडविले : तिहेरी अपघातात ट्रकच्या धडकेत रिक्षाही महामार्गाच्या खाली उलटली
जळगाव : हॉटेलात जेवण करुन शहरात घराकडे दुचाकीवरुन परतत असतांना दुचाकीला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील विवेक उर्फ विक्की पंढरीनाथ नन्नवरे (29, रा.बांभोरी, ह.मु.आहुजा नगर, जळगाव) व हेमंत चंद्रहास ललवाणी (34, मुळ रा.पहूर, ता. जामनेर ह.मु.आहुजा नगर, जळगाव) या जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी चार वाजता महामार्गावर खोटे नगराजवळ ट्रक, दुचाकीसह रिक्षाला असा तिहेरी अपघात झाला. अपघातानंतर ट्रकसह चालक घटनास्थळाहून पसार झाला होता. तर ट्रकच्या धडकेत रिक्षा महामार्गालगत खोल दरीत उलटली होती.
अपघातानंतर ट्रकसह चालक फरार
विवेक व हेमंत हे दोघं मित्र आहेत. विवेक शेती व्यवसाय तर हेमंत जैन कंपनीत कंत्राटी कामगार होता. मंगळवारी दुपारी दोघं जण एका बांभोरी परिसरातील हॉटेलमध्ये जेवले, त्यानंतर शहरात येत असताना जकात नाक्याजवळ समोरुन येणार्या ट्रकने रिक्षाला (क्र.एम.एच.19 बी.जे.204) धडक दिली. त्यात रिक्षा रस्त्याच्याकडेला जावून उलटली. त्यानंतर ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यात डोक्याला जबर मार लागल्याने विक्की व हेमंत दोघं जण जागेवरच गतप्राण झाले. या अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला. अपघात झाल्यानंतर नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रुग्णवाहिकेतून दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविले.तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. यावेळी दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली.
हेमंतची रुग्णालयात पटली ओळख
विक्की याची घटनास्थळीच ओळख पटली तर हेमंत ललवाणी याची ओळख पटत नव्हती. दोघं मित्र असल्याने तो हेमंतच असावा असा अंदाज लावण्यात आला.सायंकाळी हेमंत याचा लहान भाऊ दिपक ललवाणी व नातेवाईक यांनी रुग्णालयात धाव घेतली. मृतदेह पाहिल्यानंतर हेमंत ललवाणी याची ओळख पटली. हेमंत हा अविवाहित असून सहा महिन्यांपूर्वी त्याच्या वडीलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कुटुंबाची धुरा तो सांभाळत होता. त्याच्या पश्चात आई ज्योती व भाऊ दीपक असा परिवार आहे. मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर आईने रूग्णालयात आक्रोश केला.
सोबत जेवले अन् काही वेळातच काळाची झडप
दोघांनी हॉटेलात जेवण केले. महामार्गावर निघाले असता, काही वेळातच दोघांवर काळाने झडप घातली. दोघा जिवलग मित्रांच्या अपघाती मृत्यूबददल बांभोरी तसेच आहुजानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांत उशिरापर्यंत पंचनामा तसेच कारवाई सुरू होती. विवेक नन्नवरे याचे वडील पंढरीनाथ नन्नवरे एस.टी. विभागात सहायक वाहतूक निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आई मंगला गृहीणी तसेच पत्नी रूपाली, चार वर्षीय मुलगा चिन्मय, भाऊ उमेश , बहिण पूनम असा परिवार आहे. भाऊ उमेश हा कंपनीत कामाला आहे.