महामार्गावर दारू विक्री करणार्‍यांवर धाडसत्र; साडेनऊ लाखांचा माल जप्त

0

नंदुरबार। महामार्गावर व मार्गावर दारूविक्री करणार्‍या 137 जणांवर नंदुरबार पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या दारू विक्रेत्यांकडून एकूण 9 लाख 49 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महामार्गावर दारू विक्रीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी घालण्यात आली आहे. असे असतांना नंदुरबार जिल्ह्यातील महामार्ग व इतर मार्गावर अवैधपणे दारू विक्री होत असल्याची खबर पोलिस यंत्रणेला मिळाली होती.

त्यानुसार जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.राजेंद्र डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक गिरीषपाटील यांच्या पथकाने विविध ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली आहे. शहादा तालुक्यातील म्हसावद हद्दीत अवैध दारू तस्करी करणारे एम.एच.20 बी.वाय.7382 हे वाहन पकडले. त्यात विविध कंपन्यांचे सुमारे 1 लाख 98 हजार शंभर रूपये किंमतीची दारू आढळून आली. त्याचप्रमाणे इतर ठिकाणी देखील छापा टाकून 137 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी राबविलेल्या या विशेष मोहिमेत एकूण 9 लाख 49 हजार 645 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे महामार्गावर अवैधपणे दारू विक्री करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.