जळगाव : भरधाव वेगाने जाणार्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने जळगावातील 65 वर्षीय महिला जागीच ठार झाली. हा अपघात शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील महिला आयटीआयजवळ घडला. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रमणबाई रामराव पाथरवट (65, भगीरथ कॉलनी, जळगाव) असे मयत झालेल्या वृध्देचे नाव आहे.
पायी जाणार्या वृद्धेला ट्रकची धडक
रमणबाई पाथरवट या भगीरथ कॉलनीत कुटूंबीयांसह वास्तव्यास होत्या. पाण्याचा माठ विक्री करून त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. शनिवार, 12 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास रमणबाई पाथरवट या शौचास जाण्यासाठी निघाल्यानंतर महामार्गाच्या बाजुने पायी चालत असतांना आकाशवाणी चौकाकडून सुसाट वेगात आलेल्या अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातानंतर ट्रक चालक न थांबता धुळ्याच्या दिशेने पसार झाला. दरम्यान, अत्यवस्थ अवस्थेत रमणबाई यांना जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. पोलिसांनी कुटूंबीयांकडून अपघाताची माहिती घेतल्यानंतर अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.