लवकरच कामाला होणार सुरूवात होण्याचे संकेत
भुसावळ- मुंबई नागपूर महामार्गाचे रूपातंर चौपदरीकरण केले जात आहे मात्र या कामाला तब्बल पाच वर्ष उशिराने सुरूवात झाली असून चौपदरीकरणासाठी आवश्यक यंत्र सामुग्रीची संबधीत कंपनीने उभारणी करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे लवकरच भुसावळ विभागातील कामाला सुरूवात होणार असल्याने सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मुंबई-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला भुसंपादनाअभावी मोगरी लागली होती. यामुळे या कामाचा ठेका घेतलेल्या तत्कालीन कंपनीने चौपदरीकरणाचे काम करण्यास नकार दिला होता. यामुळे चौपदरीकरणाचे काम पाच वर्षापासून रखडल्याने नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. अखेर शासनाने भुसंपादनाचा प्रश्न मार्गी लावून या कामाची पुन्हा निविदा काढली. यामुळे संबधीत कंपनीने या कामास मे महिन्यापासून मोजणी करून सुरूवात केली आहे मात्र दोन महिन्याच्या कालावधीत कंपनीच्या आवश्यक यंत्रसामुग्री अभावी केवळ मोजणीवर भर दिला जात असल्याचे वृत्त ‘दैनिक जनशक्ती’ने प्रसिद्ध केले होते. याबाबत प्रकल्प संचालकाशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरच कामाला सुरूवात केली जाईल, असे सांगितले होते.
यंत्रसामुग्री झाली दाखल
चौपदरीकरणाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामुग्रीच्या अभावामुळे कंपनीच्या माध्यमातून महामार्गाची वारंवार मोजणी केली जात होती. यामुळे नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता मात्र संबधीत कंपनीने याची दखल घेवून विलंब होत असलेल्या कामासाठी आवश्यक यंत्रसामुग्री दाखल केल्याने लवकरच या कामाला सुरूवात होणार आहे तसेच कामगार व यंत्रसामुग्रीसाठी भुसावळ ते वरणगाव महामार्गावरील कपिलवस्तू नगरजवळ दोन ते तीन शेड उभारण्यात आल्याने अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
अनेकांना रोजगाराची संधी
कंपनीने यंत्र सामुग्री दाखल केल्याने या चौपदरीकरणाच्या कामास लवकर सुरूवात होणार आहे. यामुळे परीसरातील अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी अनेक कामगार ठेकेदाराकडे कामाची मागणी करीत असल्याचे दिसून येत आहे.