एल अॅण्ड टी कंपनीकडून सर्वेक्षणानंतर मोजमापानंतरही अधिक जमीन बळकावल्याची शेतकर्यांची तक्रार
भुसावळ- महामार्ग चौपदरीकरणात संपादीत जमिनीवर खुणा गाडल्यानंतर प्रत्यक्षात जमीन ताब्यात घेताना त्यापेक्षा अधिक जमीन ताब्यात घेण्यात आल्याची तक्रार करीत शेतकर्यांनी भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर या मनमानी प्रकाराबाबत सोमवारी सकाळी निदर्शने केली तसेच बैठकीतही संताप व्यक्त केला. शेतकर्यांनी तातडीने ताब्यात घेतलेल्या जमिनीचा मोबदला देण्याची अपेक्षा व्यक्त केली शिवाय दोन तासांपूर्वी बैठकीची सूचना देण्यात आल्याने व 12 वाजेची वेळ देवूनही वेळेत बैठक सुरू न झाल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
संपादीत जागेपेक्षा अधिक जागा बळकावली
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण करताना 2011-12 मध्ये एल अॅण्ड टी कंपनीने भू संपादनापूर्वी मोजमाप केले होते तर त्यावेळी त्याचा मोबदलाही संबंधिताना मिळाला. मात्र आता नव्याने पुन्हा कामाला गती आल्यानंतर विविध कंपन्यांकडून मोजमापाच्या व्यतिरिक्त जागा घेतल्या जात असल्याची तक्रारी शेतकर्यांनी केल्या आहेत. याबाबतच्या अनेक तक्रारी प्रांताधिकार्यांकडे आल्याने सोमवारी या तक्रारींसाठी प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर व महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा आदींच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी सुमारे 50 शेतकर्यांनी आपल्या संपादीत जागेपेक्षा अधिक जागा वापरली जात असल्याने तसेच परस्पर कोणत्याही स्वरुपाची सूचना न देता कामे होत असल्याने संताप व्यक्त केला.
विस्थापीतांचे पुर्नवसन ठप्प
महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात दीनदयाल नगरातील 100 कुटूंबे विस्थापीत होत असून 1961 मध्ये भारत मिलच्या जागेवरुन आठवडे बाजारासाठी पूर्नवसन झालेल्या दिनदयाल नगरातील रहिवाशांवर पुन्हा विस्थापीत होण्याची वेळ आली आहे. या विस्थापितांना इमल्याच्या नुकसानापोटी प्राधिकरणाकडून रक्कम मिळाली मात्र विस्थापीतांसाठी जागा देवून नियोजीत कस्तूरबा गांधी नगराची प्रक्रिया ठप्प आहे. या प्रकरणी चंद्रकांत चौधरींसह रहिवाशांनी प्रांताधिकारी, महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांसमोर गर्हाणे मांडले.
शेतकरी बैठकीत संतप्त
भुसावळ तालुक्यातून गेलेल्या महामार्गासाठी जमीन संपादीत करताना काहकी शेतकर्यांच्या शेतातून मार्ग गेल्याने शेताचे चक्क दोन भाग झाले. रस्ता आठ ते दहा फुट उंच असल्याने आता शेतात उतरण्यासाठी, बैलगाडी नेण्यासाठी देखील जागा नाही. पावसाळा तोंडावर आल्यावरही पेरण्यांसाठीची मशागती यामुळे पूर्ण होऊ शकल्या नाहीत, अशा तक्रारींचा पाढाही शेतकर्यांनी मांडला. दरम्यान, शेतकर्यांना सोमवारी दुपारी 12 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सकाळी दहा वाजता मोबाईलव्दारे दिली गेली. दोन तास आधी मिळालेल्या बैठकीच्या सूचनेनुसार शेतकरी व प्लॉट धारकांना हातचे काम सोडून प्रांताधिकारी कार्यालय गाठावे लागले.