पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी – पिंपरी ते हॅरिस ब्रिज दरम्यान महामेट्रोमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार 135 झाडांचे पुनर्रोपण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यानुसार वृक्ष पुनर्रोपणासाठी डेमो म्हणून पाच झाडांची निवड करण्यात आली आहे. यापैकी तीन झाडांचे बुंधे बांधून ठेवण्यात आले आहेत. त्यातील एक झाड गुरुवारी वल्लभनगर येथील मेट्रोच्या सहयोग केंद्रात हलविण्यात आले.
135 झाडे हलविणार
मोहघनी खाया प्रकारचे हे झाड असून या एका झाडाला हलविण्यासाठी सुमारे सात तासांचा कालावधी लागला. या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने एका दिवशी एक झाड काढण्यात मेट्रो प्रशासनाला यश आले. अन्य दोन झाडे वल्लभनगर येथील मेट्रो सहयोग केंद्रात लवकरच हलविण्यात येणार आहेत, अशी माहिती मेट्रो प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
पुनर्रोपणासाठी तीन टप्पे
वृक्षांचे आधुनिक पद्धतीने पुनर्रोपण करताना तीन टप्पे वापरण्यात येतात. त्यामध्ये पहिल्या टप्पा कॅनोपी मॅनेजमेंटचा असतो. यामध्ये झाडांचे पूर्णपणे सर्वेक्षण करून त्याच्या फांद्या व पानांचे सर्वेक्षण केले जाते. झाडाचा आधार एकत्रित करण्यात येतो. दुसर्या टप्प्यात रुफ्टींग करण्यात येते. यामध्ये मुळे बांधून ठेवण्यात येतात. तिस-या टप्प्यात झाड एका जागेवरून दुसर्या जागेवर नेण्यात येते. ज्या ठिकाणी पुनर्रोपित करायचे आहे, त्या ठिकाणी देखील शास्त्रीय पद्धतीने त्याचे रोपण करण्यात येते.