मागणी 400 कोटींची, तरतूद 230 कोटींची
पुणे : पुणे मेट्रोच्या एका मार्गाचे काम डिसेंबर-2019 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असतानाच राज्य सरकारने मात्र महामेट्रोला निधी देण्यासाठी आखडता हात घेतला आहे. महामेट्रोने 400 कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली होती. मात्र, राज्य सरकरच्या अंतरिम अंदाजपत्रकात 230 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, सुमारे 12 हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी महामेट्रो सुमारे 6 हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारणार आहे.
मोठ्या प्रमाणात निधीची गरज
पुणे मेट्रोचे काम सध्या अत्यंत वेगाने सुरू असून, डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो कार्यान्वित करण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे. मेट्रोच्या मार्गिका आणि स्टेशन बांधकामासह आता ओव्हरहेड वायरिंग, कम्युनिकेशन, सिग्लनिंग अशा विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज लागणार आहे. त्यामुळे, महामेट्रोने साडेचारशे ते पाचशे कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. राज्यात एकाचवेळी मेट्रोची अनेक कामे सुरू असल्याने पुणे मेट्रो प्रकल्पातील राज्य सरकारच्या समभागापोटी 170 कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. तर, 60 कोटी रुपयांचा निधी बिनव्याजी दुय्यम कर्ज म्हणून देण्यात येणार आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला महामेट्रोला 70 कोटी रुपये वितरित केले होते. तर जानेवारीमध्ये अतिरिक्त 250 कोटी रुपये देण्यात आले आहेत.