नवी दिल्ली: महाराष्ट्राचे राजकारण सध्या संपूर्ण देशात चर्चेचा मुद्दा ठरत आहे. रातोरात राष्ट्रपती राजवट उठवून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अखेर सरकार स्थापन झाले आहे. मात्र ३० नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी रान उठविले आहे. अजित पवारांनी आमदारांच्या सह्यांचे चुकीच्या पद्धतीने वापर केले असल्याने हे सरकार घटनाबाह्य असल्याचे आरोप केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे संसदेत देखील पडसाद उमटले आहे. विरोधकांनी राज्यसभेत गदारोळ केल्याने राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. तसेच लोकसभेत देखील विरोधकांनी गदारोळ केला. लोकशाहीची हत्या भाजप सरकारने केले असल्याचे आरोप विरोधकांनी संसदेत केले. विरोधकांनी संसदेबाहेर येऊन आंदोलन केले.
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. या याचिकेवर आज सुनावणी सुरु आहे. अजित पवारांनी शपथविधीसाठी दिलेल्या कागदपत्रांची तपासणी कोर्टात झाली.