शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी अद्यापही सुरुच आहेत. सोमय्या यांनी राऊत यांच्यासह थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि कुटुंबियांपर्यंत आरोप केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या हे दलाल, लफंगा, चोर आहेत. ते स्वत:च्याच चपलेनं मार खाणार आहेत. तसेच लोक त्यांची धिंड काढतील. सोमय्या पुढे आणि लोक मागे असे चित्र दिसेल. सोमय्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावे कोट्यवधी रुपये उकळले आहेत. तसेच अमित शाहांची भीती दाखवूनही वसुली केली आहे, असा आरोप केला. महाराष्ट्रात 25 हजार कोटी रुपयांचा महाआयटी घोटाळा झाला होता. या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाले होते, असे नानाविध आरोपही त्यांनी केले. या आरोपांना उत्तर देण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे मैदानात उतरले. संजय राऊतांचे लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर आहे. त्यांना सुपारी मिळाली आहे, यांना हटवा, तुम्हालाच मुख्यमंत्री करतो. उद्धव ठाकरे जेव्हा सरकार स्थापनेबाबत पहिल्यांदा शरद पवारांना भेटायला गेले होते, तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे होते. संजय राऊतांची कुंडली माझ्याकडे आहे. मी आज ओळखतो का तुम्हाला असा बॉम्बगोळा नारायण राणेंनी टाकला. त्याला काही तास उलटत नाही तोच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी 19 बंगले नावावर करण्यासाठी कोर्लई ग्रामपंचायतीला लिहिले होते. ते पत्रच किरीट सोमय्यांनी ट्वीटरला शेअर केले. किरीट सोमय्या यांनी गेल्या काही महिन्यांपासून ज्याप्रकारे शिवसेनेच्या विविध नेत्यांवर आरोपांची मालिका सुरू केली आहे त्यामध्ये खासकरून त्यांनी संजय राऊत यांना टार्गेट केले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या आणि त्यांच्या पुत्रावर आरोप केले होते. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांना उत्तर देताना नव्या प्रकारचे काहीतरी आरोप केले. त्यानंतर दुपारी भाजपचे नेते नारायण राणे यांनीही पत्रकार परिषद घेऊन या सर्व पत्रकार परिषदेच्या राजकारणामध्ये उडी घेतली. पत्रकार परिषदेच्या राजकारणात अनेक नेत्यांचा बोलताना तोल सुटत आहे. संजय राऊत यांची भाषा तर पातळी सोडूनच दिसते. यात त्यांचा संताप आहे कि वैफल्यग्रस्तता? हा संशोधनाचा विषय ठरु शकतो.
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषेदला शिवसेनेचे कोणतेच मोठे नेते\ दिसले नाहीत. हिच गोष्ट नवाब मलिकांनाही लागू पडते. त्यांनी जेंव्हा जेंव्हा भाजप विरोधात पत्रकार परिषद घेतली तेंव्हा कधीच राष्ट्रवादीचा नेता त्यांच्या सोबत दिसला नाही. यामुळे साहजिकच या नेत्यांच्या भूमिकेला त्यांच्या त्यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे की नाही, याबाबत शंका निर्माण होते. ज्याप्रकारे सर्वच राजकीय पक्षांचे नेते आपल्या विरोधकांवर आरोप करताना मोठमोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा पर्दाफाश करत असताना या सर्व विषयांमध्ये तपास यंत्रणा कुठे गेल्या आहेत, या एका प्रश्नाचे उत्तर मात्र कोणीही द्यायला तयार नाही. ते विषय या माध्यमातून समोर आल्यामुळे जनतेला जरी समजत असले तरी त्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी ते योग्य तपास यंत्रणेकडे देण्याची गरज आहे. तसे झाले नाही तर या सर्व विषयांना काहीच अर्थ राहणार नाही. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोप वाढत चालले असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीतील बेबनाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात 10 मार्चनंतर मोठे बदल दिसतील, असे विधान केले होते. यानंतर आता काँग्रेस नेत्यांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. हे सर्व राजकारण आता नकोसे झाले आहे. महाराष्ट्राची प्रतिमा खराब करणार्या या राजकारणाला ब्रेक लावण्यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनीच पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आहे.