अलीबाग । राज्यात सध्या भोंदू सरकार आहे. या सरकारला शेतकर्यांबद्दल कळवळा नाही. केवळ भूलथापा देण्याचेच उद्योग हे सरकार करीत आहे. या सरकारवर कलम 420 नुसार गुन्हाच दाखल व्हायला हवा. अशा शब्दांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महाडमध्ये सरकारवर हल्लाबोल केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी राज्यात काढलेल्या संघर्ष यात्रेचा कोकणातील शेवटचा टप्पा महाड येथून सुरू करण्यात आला.
उध्दव ठाकरेंना विखेंचा टोला
यावेळेस अजित पवार यांनी राज्यात शेतकर्यांचे रोज नवेनवे प्रश्न निर्माण होत आहेत. शेतकरी आत्महत्यांमध्ये 64 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तुरीचा पैसा शेतकर्यांना मिळालेला नाही. येत्या अधिवेशनासंदर्भात काय भूमिका घ्यायची, याचा निर्णय 19 मे रोजी विरोधी पक्षाच्या बैठकीमध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यातील सरकार भोंदूगिरी करणारे असल्याचे सांगत सरकारविरोधात 420 कलमाखाली गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी भूमिका मांडली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रोज आपली भूमिका बदलत असतात असे सांगून विखे पाटील यांनी उद्घव ठाकरे हे राजकारणातील लखोबा लोखंडे आहेत, असा टोला लगावला.