भारीपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांची पत्रकार परीषदेत माहिती : आमचा पक्ष बहुजनांना न्याय देणारा
भुसावळ- 70 वर्षात 70 परीवारांनी सत्ता उपभोगून कुटुंबातील सदस्यांना पदे दिली त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांनी आता तिसरा पर्याय म्हणून वंचितांची आघाडी उघडली असून आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व 48 जागांवर आम्ही लढणार असून आता महाराष्ट्राला तिसर्या आघाडीचा पर्याय असल्याचे मत भारीपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी शहरातील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परीषदेत व्यक्त केले. भारीपच्या मेळाव्यानिमित्त ते शहरात सोमवारी आले असता त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी माजी मंत्री दशरथ भांडे यांनीदेखील घटना मोडून काढणार्या व घटना टिकवून ठेवणार्यांमध्ये आता लढा असल्याचे सूचक वक्तव्य करीत बाळासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बहुजन आंबेडकरवादी आता एकत्र येत असल्याचे सांगितले.
नक्षलवादाला कदापि समर्थन नाही -अशोक सोनोने
बाळासाहेब आंबेडकरांनी एमआयएमच्या ओवेसी यांच्यासोबत केलेली युती ही नक्षलवादाला समर्थन नाही का? असा प्रश्न छेडल्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने म्हणाले की, आमचे कदापि नक्षलवादाला समर्थन राहिलेले नाही. बहुजनांना न्याय देणारा हा आमचा पक्ष आहे. लाभार्थीला लाभ देण्याचे काम आम्ही करीत असून आम्हाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अपप्रचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ओवेसी यांच्यासोबत झालेल्या युतीमुळे मतांचे धु्रवीकरण होवून भाजपा-सेनेला फायदा होईल का? या प्रश्नावर सोनवणे म्हणाले की, लाचारी पत्करणारा आमचा नेता नाही. विदर्भाने आमचे नेतृत्व स्विकारले असून सत्तेत पाठवणारा आमचा हा पक्ष असून महाराष्ट्रात सोशल इंजिनिअरींग फार्म्युला वापरणार असल्याचे त्यांनी सांगत भाजपा-सेना व काँग्रेस-राष्ट्रवादी यांना वगळून आम्ही तिसरी आघाडी निर्माण केली असून काँग्रेसला आम्ही 12 जागांची मागणी केली होती मात्र त्यांच्याकडून अद्याप उत्तर आले नसल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभेच्या सर्व जागा लढणार
काँग्रेसला जून महिन्यात आम्ही 12 जागांबाबत प्रस्ताव दिला होता. त्यात माळी, मुस्लीम, ओबीसी, मायक्रो ओबीसी, भटक्या जमातीला प्रत्येकी दोन जागा देण्याची मागणी केली होती मात्र त्यांनी प्रस्तावाबाबत अद्याप उत्तर दिलेले नाही. आमच्यासोबत अनेकांनी हात मिळवणी केली आहे, अनेक पर्याय आम्हाला येत असून‘धनशक्तीविरुद्ध जनशक्ती’, अशी आमची आगामी लढाई राहणार आहे. बाळासाहेबांना विश्वासात घेतल्याशिवाय 2019 मधील लोकसभा स्थापन होणार नाही, असा दावाही सोनोने यांनी केला.
भाजपा-सेनेशी कदापि युती नाही
भाजपा-सेनेशी हात मिळवणी करणार का ? या प्रश्नावर सोनवणे यांनी आक्रमक पद्धत्तीने सांगितले की, कदापि आम्ही त्यांच्याशी युती करणार नाही कारण आम्ही संविधानाची तोडमोड करणार्यांसोबत नव्हे तर संविधान जोडणार्यांसोबत आहोत. भीमा-कोरेगाव दंगलीचा संदर्भ देत हे सरकार असंवेदनशील असल्याची टिका त्यांनी केली. दिल्लीतील केजरीवाल सरकारचे उदाहरण देत महाराष्ट्रातही असाच चमत्कार होईल, असा दावा त्यांनी प्रसंगी केला. आगामी काळात 36 जिल्हा संकल्प मेळावे घेणार असून अनेकांना पक्षात प्रवेश दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हिरासिंग राठोड म्हणाले की, स्वातंत्र्यांनंतर कुठल्याही पक्षाने बहुजनांना न्याय दिलेला नाही. भाजपा सरकार असंवेदनशील असल्याची टिका त्यांनी केली.
यांची होती उपस्थिती
पत्रकार परीषदेस महाराष्ट्र सहसचिव प्रा.सुरेश शेळके, जिल्हा निरीक्षक शरद वसतकर, खामगावचे गणेश चौकस, भारीप जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, दिनेश ईखारे, संजय सुरळकर, प्रवीण आखाडे, मुकेश साळुंखे, गणेश इंगळे, महेश तायडे, किशोर जाधव, रवी ब्राह्मणे, संजय सुरळकर, बाळू शिरतुरे, मानव आव्हाड, गौतम निकम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.