पुणे/मुंबई : भीमा कोरेगाव येथील दंगल व हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यभरातील दलित संघटनांसह बहुजन संघटनांनी बुधवारी पुकारलेला बंद यशस्वी झाला असला तरी, या बंदला मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, नांदेड, कोल्हापूर, नागपूर, नाशिकसह राज्यभरात हिंसक वळण लागले. आंदोलकांनी बसेस, वाहने यांच्यावर दगडफेक करत या वाहनांसह खासगी व सार्वजनिक मालमत्तांना आगी लावल्या. पोलिसांवरही हल्ले करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात पोलिसांच्या लाठीहल्ल्यात दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर औरंगाबादेत पोलिसांनी संतप्त जमावावर गोळीबार करत अश्रुधुराचे नळकांडेही डागले. त्यामुळे औरंगाबादेत दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यभर उसळलेल्या हिंसाचारात 168 बसेस फोडण्यात आल्या असून, एसटी महामंडळाचे दोन कोटींच्या घरात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. एकट्या औरंगाबादेत 31 बसेस फोडण्यात आल्या आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्येही 18 सिटी बसेसवर दगडफेक करण्यात आली असून, शहरात दिवसभर 70 मोर्चे निघाले होते. या दोन्ही शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे दिवसभर शहरे तणावात होती. दंगलीला कारणीभूत धरून आंबेडकरी अनुयायांनी समस्त हिंदू संस्थेचे मिलिंद एकबोटे यांच्या घरावर मोर्चा नेला. परंतु, पोलिसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला. उग्र मोर्चेकरांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने तेथून हटविले.
मुंबईतही आंदोलकांनी बसेस जाळल्या व रेल्वे रोको केला. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन ठप्प पडली होती. महाराष्ट्रातील हिंसाचाराचे संसदेतही तीव्र पडसाद उमटले. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खारगे यांनी या हिंसाचारामागे भाजप व रा. स्व. संघाचा हात असल्याचा आरोप केला. या हिंसाचारप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत? असा सवाल करून त्यांनी मोदींना ‘मौनीबाबा’ ही उपाधी दिली. दिवसभराच्या हिंसक घटनानंतर सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हा बंद मागे घेत असल्याची घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. बंद शांततेत पार पाडल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले व झालेल्या हिंसाचाराला हिंदुत्ववादी संघटना जबाबदार आहेत, असा आरोप केला. राज्यभरातील हिंसक घटनांची चौकशी करण्यात येईल, आणि कायदा हातात घेणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
बंदमध्ये दलितांसह ओबीसींचाही सहभाग : आंबेडकर
मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारचा बंद मागे घेत असल्याची घोषणा केली. दुपारनंतर बंदला हिंसक वळण लागल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात असून, त्याला राज्य सरकार जबाबदार आहे, अशी भूमिकाही त्यांनी घेतली होती. दरम्यान, सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घेतलेल्या पत्रकार परिषदेत अॅड. आंबेडकर म्हणाले, की या बंदला समविचारी आणि डाव्या संघटनांचा पाठिंबा मिळाला. दोन-तीन घटनांचा अपवाद वगळता हा बंद शांततेत पार पडला, असा दावाही त्यांनी केला. भीमा कोरेगावमधील हिंसेला जबाबदार असलेले शिवप्रतिष्ठाणचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना अटक केली जाईल, अशी अपेक्षा बाळगून आम्ही बंद मागे घेत आहोत, असेही आंबेडकर यांनी नमूद केले. या दोघांना अटक झाली नाही तर पुन्हा आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. या दोघांच्या अटकेची मागणी लावून धरताना 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणी फाशी देण्यात आलेल्या याकूब मेमनचा दाखला दिला. याकूबचा बॉम्बस्फोटात प्रत्यक्ष सहभाग नसला तरी, स्फोट घडविण्यामागे त्याचा हात होता. त्यामुळे त्याला सर्वोच्च न्यायालयाने 302 या खुनाच्या कलमाखाली दोषी ठरवले होते. याच न्यायाने भीमा कोरेगावजवळील सणसवाडीत झालेल्या हिंसेचे पडद्यामागील सूत्रधार संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली. आजच्या बंदमध्ये दलितांसोबत ओबीसीबांधवही या बंदमध्ये उतरले, असा दावाही आंबेडकर यांनी केला. औरंगाबादेत पोलिसांनी जे कोम्बिंग ऑपरेशन सुरु केले, ते थांबवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आता शांतता राखण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे!
आमचा बंद आम्ही मागे घेतला आहे; मी आतापर्यंत नियंत्रण ठेवून शांतता भंग होऊ दिली नाही. मात्र आता माझी जबाबदारी संपली आहे. भीमा कोरेगावच्या पार्श्वभूमीवर अनेक संघटना एकत्र आल्या होत्या. या सगळ्याच संघटना आमच्या हातात नाहीत. त्यामुळे मी बंद मागे घेतल्यानंतर या अन्य संघटना माझे ऐकतीलच याची शाश्वती देता येणार नाही. तेव्हा महाराष्ट्रात यापुढे शांतता राखण्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे, असेही पत्रकार परिषदेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यभर झालेल्या हिंसक आंदोलनात 168 बसेसची तोडफोड झाली असून, राज्य परिवहन महामंडळाचे दोन कोटींचे नुकसान झाले आहे. औरंगाबाद शहरातही 31 बसेस तर पुणे-पिंपरी-चिंचवड शहरात 18 बसेस फोडण्यात आल्या आहेत. मुंबई, औरंगाबाद, नाशिकसह अनेक मोठ्या शहरात शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच, मुंबईतील रेल्वेसेवा ठप्प पडली होती. मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या सर्वच भागात जोरदार हिंसाचार उफळल्याचे दिसून आले.
आंबेडकर अनुयायी मिलिंद एकबोटेंच्या घरावर धडकले
समस्त हिंदू एकता संस्थेचे मिलिंद एकबोटे यांनी भीमा कोरेगाव दंगल भडकाविली असा आक्षेप घेऊन आंबेडकर अनुयायांनी त्यांच्या पुण्यातील शिवाजीनगर येथील निवासस्थानावर धडक दिली. मोठ्या प्रमाणात तरुण व नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. परंतु, पोलिसांनी अत्यंत संयमाने व शिताफीने परिस्थिती हाताळली. यावेळी जमावाने एकबोटे, संभाजी भिडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. दरम्यान, काल एकबोटे व भिडे यांच्याविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आजही येरवड्यात या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुणे पोलिसांनी एकबोटे यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार्यांवर गुन्हे : पोलिस आयुक्त
पुणे शहरात बंद शांततेत पार पडला असल्याची माहिती पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली. ज्या ठिकाणी सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे, त्या दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींची ओळख पटविली जाईल, असेही शुक्ला यांनी सांगितले. दिवसभरात 18 बसेसवर दगडफेक करण्यात आली असून, शहरात 70 छोटे-मोठे मोर्चे निघाले होते. एकबोटे व भिडे यांच्यावर येरवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. पीएमपीच्या सरासरी 50 ते 55 बसेसचे नुकसान झाल्याचीही माहिती हाती आली असून, शहरात 21 ठिकाणी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. दांडेकर पूल, अपर इंदिरानगर, पिंपरी, ताडीवाला रोड, चंदननगर या भागात तणाव निर्माण झाला होता. परंतु, या भागात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने काहीही अनुचित घटना घडली नाही. सायंकाळनंतर 80 टक्के बंदोबस्त काढून घेतला, असेही शुक्ला यांनी सांगितले.
ठळक बाबी
1. आ. जिग्नेश मेवाणी – उमर खालिद यांच्याविरोधात पुण्यात तक्रार दाखल. या दोघांनी भडकावू भाषण केल्याचा आरोप. या दोघांच्या भाषणानेच दंगड भडकल्याचा आक्षेप.
2. कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी शेकडो जणांना अटक, कसून चौकशी सुरु.
3. दोन हिंदू संघटनांवर गुन्हे दाखल, भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटेंविरुद्ध अॅट्रोसिटीसह इतर कलमान्वये गुन्हे दाखल.
4. लोकसभेत काँग्रेसचा मोदींवर हल्ला, देशात अशा घटना घडतात तेव्हा मोदी एक शब्दही बोलत नाहीत : खारगे
5. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये बंद यशस्वी, दगडफेक, दोन दिवसांत पीएमपीएलच्या 55 बसेस फोडल्या
6. औरंगाबादेत पोलिस आक्रमक, गोळीबार, कोम्बिंग ऑपरेशन, 500 जणांना धरपकड
7. आष्ठी येथे पोलिसांच्या लाठीमारात दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, वातावरण तापले
8. भीमा कोरेगाव येथील हिंसाचार निषेधार्ह, दोषींवर कठोर कारवाई करा : रा. स्व. संघ