महाराष्ट्र केसरी चौधरींच्या नोकरीचा पडला विसर

0

मुंबई (ब्रम्हा चट्टे ) ।पारदर्शी आणि गतिमान कारभाराचा दावा करणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्याच घोषणेचा विसर पडला आहे. सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी झालेल्या विजय चौधरी यांना सात दिवसात शासकीय सेवेत घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून 50 दिवस उलटून गेले आहेत. मात्र,याबाबत कोणतीच पुर्तता होताना दिसत नसल्याने राज्य सरकारच्या कार्यतत्परतेचे धिंडवडे निघाले आहेत.

घोषणा हवेत विरली
चाळीसगाव येथील विजय चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पुण्यातल्या वारजे गावात झालेल्या स्पर्धेत विजय चौधरीेने अभिजित कटकेवर मात करुन सलग तिसर्‍यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उचलण्याचा मान मिळवला आहे. या विजयासह विजय चौधरीने नरसिंग यादवच्या सलग तिसर्‍यांदा महाराष्ट्र केसरी जिंकण्याच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान विधानसभेत विजय चौधरींचे अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी विजयला सात दिवसात शासकीय नोकरी देण्याची घोषणा केली होती. विजयला शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या सर्व बाबींची पूर्तता झाली आहे, त्यामुळे कुठल्याही शिफारशीशिवाय आठवड्याभरात विजय चौधरींनी नोकरी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. तसेच विजयला ऑलिम्पिकसाठी देखील मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मात्र,यापैकी कोणत्याच गोष्टी होत नसल्याने विजय चौधरी यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

विजय चौधरी नोकरीसाठी प्रतिक्षेत
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला चौधरींचा अभिमान असल्याची भावना अभिनंदनाच्या ठरावात मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलून दाखवली होती. विजयला नोकरीत सामावून घेण्यासाठी नियमात बदल करावे लागल्यामुळे घोषणेनंतर वेळ गेल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अभिनंदन प्रस्तावाला अनुमोदन दिले होते. मात्र गेल्या पन्नास दिवसात सरकार कसला नियम बनवत आहेत असा प्रश्न क्रिडा जगताला सतावत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून विजय चौधरी नोकरीच्या प्रतीक्षेत आहे.