मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा
नांदेड मध्ये एका वर्षात दोन लाख शौचालयांचे निर्माण झाल्याची माहिती
हे देखील वाचा
मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निकष पूर्ण करून महाराष्ट्र राज्य हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात केली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यात राज्य हागणदारीमुक्त होणार होते ,मात्र पाणी पुरवठा स्वच्छता आणि ग्रामविकास विभागाने अत्यंत चांगले काम केल्याने विक्रमी वेळेत हागणदारी मुक्त महाराष्ट्र करण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. नांदेड मध्ये एका वर्षात दोन लाख , यवतमाळ मध्ये शेवटच्या सहा महिन्यात दीड लाख तर गडचिरोलीत ५४ हजार शौचालयांचे निर्माण करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले .
ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांना वैयक्तिक अथवा सार्वजनिक शौचालय उपलब्ध झाल्याने राज्याला हागणदारीमुक्त करण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात असलेल्या शौचालयांचा वापर कारण्यासासंदर्भात देशपातळीवर विविध उपक्रम आणि जाहिराती करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले . गेल्या २०१७- १८ या आर्थिक वर्षात २२ लाख ५१ हजार ८१ शौचालयांची निर्मिती करण्यात आली तर २ लाख ८१ हजार २९२ सामूहिक अथवा सार्वजनिक शौचालयांचे निर्माण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. गेल्या ६५ वर्षात राज्यात केवळ ४५ टक्के शौचालयांची निर्मिंती झाली तर केवळ युती शासनाच्या काळात ५५ टक्क्यांवर शौचालयांची निर्मिती करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले . स्वच्छ भारत मिशनवर या सरकारने केंद्र आणि राज्यसरकार मिळून आतापर्यंत ४५०० कोटी रुपये खर्च केल्याचे त्यांनी सांगितले . राज्यात आमदार आणि खासदार यांच्या निधीतूनही शौचालय बांधण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले .
मागील चार वर्षात बांधण्यात आलेल्या शौचालयाची माहिती त्यांनी दिली. यामध्ये सन 2013-17 मध्ये 2 लाख 21 हजार 849, सन 2014-15 मध्ये 4 लाख 88 हजार 402, सन 2015-16 मध्ये 8 लाख 82 हजार 053, सन 2016-17 मध्ये 19 लाख 16 हजार 461 तर सन 2017-18 मध्ये 22 लाख 51 हजार 081 तर सार्वजनिक व सामुहिक शौचालय 2 लाख 81 हजार 292 अशी मिळून वैयक्तिक व सार्वजनिक 60 लाख 41 हजार 138 शौचालय बांधण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले 351 तालुके, 27 हजार 667 ग्रामपंचायती, 40 हजार 500 गावे हागणदारीमुक्त होऊन महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त झाल्याचे त्यांनी घोषित केले.