राष्ट्रवादीचा दावा, मुख्यमंत्र्यांना दिले आव्हान
मुंबई :- सरकारने हागणदारीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी ४ हजार ७१ कोटी रुपये खर्च केले परंतु ही सत्य परिस्थिती नाही. त्यामुळे सरकारने महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला याची कोणत्या पातळीवर तपासणी केली आणि तसे ऑडिट केले का? असा थेट सवाल करतानाच सरकारच्या या घोषणेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेवून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या हागणदारीमुक्त महाराष्ट्र घोषणेवर जोरदार आक्षेप घेतला.
हे देखील वाचा
महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्यासाठी सरकारने ४ हजार ७१ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ही मोठी घोषणा करत असताना जाहिरातबाजीही करण्यात आली. युपीए सरकार असताना निर्मल भारत योजना आणली.राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या नेतृत्वात राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाने व्यापक स्वरुप घेतले. मात्र आता सरकार फक्त दिखावा करते आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.
मुंबईची जबाबदारी आमच्याकडे नाही असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मुंबई शहर हागणदारीमुक्त झाल्याचे सर्टिफिकेट दिले. अभिनेता अक्षय कुमार त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र अक्षय कुमार यांच्याच पत्नीने मध्यंतरी मुंबईतील अस्वच्छतेबाबात ट्वीट करत विरोधाभास दाखवून दिला होता. आम्ही मुंबईत मॉर्निंग सफारी काढू,गाडया,जागा आम्ही निवडू. मुख्यमंत्र्यांनी या सफारीत सहभाग घ्यावा. मुंबई शहर हागणदारीमुक्त झाले की नाही ते दाखवून देवू असे आव्हान देतानाच मुख्यमंत्र्यांनी फक्त हा आकडेवारीचा खेळ केला आहे असाही आरोप केला. महाराष्ट्र हागणदारीमुक्त झालेला नाही. ग्रामीण-शहरी दोन्ही भाग अदयाप अस्वच्छच आहेत. सरकारने जनतेसमोर सत्यता ठेवावी आणि जनऑडिटची योजना जाहीर करावी असे खुले आव्हान नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.