महालक्ष्मी नगरात पेट्रोल टाकून विकृताने दुचाकी जाळल्या

In Mahalakshmi Nagar in Bhusawal , two bikes were set on fire by unknown persons in the middle of the night भुसावळ : अज्ञात आरोपींनी मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव रोडवरील महालक्ष्मी नगरातील सौभाग्य मंगल कार्यालयाशेजारील भागात दोन दुचाकींना पेट्रोल टाकून पेटवल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी शहर पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी नुकसानीची पाहणी केली. एक संशयीत सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे.

दोन दुचाकी पेटवल्या
जळगाव रोडवरील सौभाग्य मंगल कार्यालयाच्या शेजारी शंकर गिरधरप्रसाद मिश्रा यांची पल्सर (एम.एच.19 डी.वाय.6774) व स्प्लेंडर (एम.एच.19 ए.सी.9629) ला रविवारी रात्री 12 वाजून 50 वाजेच्या सुमारास पेट्रोल टाकून आग लावल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले.

शहर पोलिसात तक्रार
आग लागल्याचे लक्षात येताच मिश्रा कुटूंबियांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणल्यानंतर तिसर्‍या गाडीचे सुदैवाने नुकसान टळले. या प्रकरणी शंकर मिश्रा यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे. शहर पोलिस ठाण्याचे एएसआय मोहम्मद वली सैय्यद, जाकीर मन्सुरी यांनी नुकसानीची पाहणी केली.