बचतगटांच्या विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन
मुंबई : एक महिला आर्थिकदृष्ट्या आत्म निर्भर होते, तेंव्हा एका कुटुंबाचे जीवनमान सुधारते. तेव्हा राज्यातील सर्व एअरपोर्ट, रेल्वे स्थानक तसेच बसस्थानकावर महालक्ष्मी सरसचे स्टॉल सुरु करावेत, अशी सरकारला सूचना करुन महालक्ष्मी सरस हे निव्वळ प्रदर्शन नाही तर हा गरीब, वंचित ग्रामीण जनतेसाठीचा खरा समृद्धीचा महामार्ग आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी बुधवारी केले.
महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन २०१८ च्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी ग्राम विकास व महिला-बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दादा भुसे, खासदार पूनम महाजन, आमदार तृप्ती सावंत तसेच ग्राम विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, कोकणचे विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, नाबार्डचे एच आर दवे, आर. विमला आदी उपस्थित होते. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए ग्राउंडवर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी राज्यपाल राव म्हणाले, एक महिला शिकते, तेंव्हा एक घर साक्षर होते. तसेच, एक महिला आर्थिकदृष्ट्या आत्म निर्भर होते, तेंव्हा एका कुटुंबाचे जीवनमान सुधारते. महालक्ष्मी सरस प्रदर्शनाची उलाढाल एक कोटी रुपयांवरून, सहा कोटी रुपये इतकी, वाढली आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. पण आज अॅमॅझोन, फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्या आपल्याच देशातील विविध वस्तू ऑनलाइन विकून हजारो कोटी रुपये कमावत आहेत. त्यामुळे महालक्ष्मी सरस ने आता किमान शंभर कोटी रुपये, इतके ध्येय ठेवले पाहिजे. प्रत्येक मॉल तसेच डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये महालक्ष्मी सरसची उत्पादने वर्षभर उपलब्ध झाली पाहिजे. येथील सर्व पदार्थ तसेच उत्पादनांचे पॅकेजिंग, ब्रँडींग व मार्केटिंग झाले पाहिजे. त्यामुळे शेतकरी, कामगार, महिला तसेच कारागीर यांना योग्य आर्थिक मोबदला मिळेल. तसेच राज्यातील प्रत्येक एअरपोर्ट, रेल्वे स्थानक तसेच बसस्थानकावर महालक्ष्मी सरसचे स्टॉल सुरु करावेत. महालक्ष्मी सरस हे निव्वळ प्रदर्शन नाही. तर महालक्ष्मी सरस हा गरीब लोकांसाठी ग्रामीण जनतेसाठी व आदिवासी लोकांसाठी खरा समृद्धीचा महामार्ग आहे. या समृद्धी महामार्गाच्या निर्मितीसाठी ग्राम विकास विभागाने पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, स्वयंसहाय्यता गटाच्या व स्वरोजगारींच्या उत्पादनाची प्रसिध्दी व विक्री मोठया प्रमाणावर व्हावी यासाठी मुंबईत दरवर्षी डिसेंबर महिन्यात सन 2003 पासून महालक्ष्मी सरस नावाने व्यापक प्रमाणात विक्री व प्रदर्शन भरविण्यात येते. या प्रदर्शनात सुरुवातीस 500 कारागिरांच्या सहभागापासून सुरुवात होऊन मागील वर्षी सुमारे 2000 हून अधिक कारागीर सहभागी झाले होते. त्याच प्रमाणे विक्रीही 1 कोटीवरुन वाढत जाऊन 7 कोटीहून अधिकपर्यंत झाली. या वर्षी प्रदर्शनात महाराष्ट्रासह 28 राज्यातील सुमारे 2000 ते 2200 कारागीर सहभागी झाले आहेत. राज्य शासनाने बचतगटांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याची महत्वाकांक्षी योजना सुरु केली असून राज्यात आतापर्यंत ४ हजार ६६२ बचतगटांना याचा लाभ झाला आहे, अशी माहितीही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली. या योजनेंतर्गत आतापर्यंत १ कोटी ५२ लाख रुपयांचे व्याज अनुदान वितरीत करण्यात आले आहे. यापुढील काळातही या योजनेला चांगली गती दिली जाईल, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारांच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या महिला बचतगटांना गौरविण्यात आले. कार्यक्रमानंतर राज्यपालांनी प्रदर्शनातील उत्पादनांची माहिती घेत महिला बचतगटांचे कौतुक केले.