महाळुंगेतील लुमॅक्सचे 35 कामगार बडतर्फ

0

चाकण । खेड तालुक्यातील महाळुंगे इंगळे येथील लुमॅक्स इंडस्ट्रीज लि. कंपनीच्या 105 कायम कामगारांपैकी 35 कामगारांना व्यवस्थापनाने तडकाफडकी बडतर्फ केले आहे. तर उर्वरित 70 कायम कामगारांना कामगार आयुक्तांनी कामावर रुजू करून घ्यावे, असे आदेश दिल्यानंतरही कंपनीने हमीपत्र भरून दिल्याशिवाय कामावर घेण्यास मज्जाव केल्याचा प्रकार सोमवारी कंपनीच्या प्रवेशद्वारावर घडला. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ (इंटक) या कामगार संघटनेचे सदस्यत्व कामगारांनी सोडल्याशिवाय कंपनीत प्रवेश देणार नसल्याची भूमिका कंपनीच्या अधिकार्‍यांनी घेतली असून कायम कामगारांनी चाकण पोलिसांकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत.

लुमॅक्स इंडस्ट्रीज लि. कंपनीतील 105 कायम कामगारांनी वरील कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यामुळे व्यवस्थापनाने 35 कामगारांना तडकाफडकी बडतर्फ करून त्यांचे हिशोब बँक खात्यांमध्ये जमा केले आहेत. दरम्यान, पुण्यात कामगार आयुक्तांच्या समोर कंपनीच्या व्यवस्थापनाच्या वतीने संदीप कुंभार आणि पी. सी. धारिया तर कामगारांच्या वतीने इंटकचे सदस्य आणि कामगार यांची शनिवारी बैठक झाली होती.

70 कामगारांना कामावर घेण्याचे आदेश
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ (इंटक) या संघटनेचे प्रदेश सचिव संजय कदम यांनी सांगितले की, कंपनी व्यवस्थापनाला कामगार आयुक्तांनी 70 कामगारांना कामावर घेण्याचे आदेश दिले असून हे कामगारांच्या लढ्याचे यश आहे. कंपनी व्यवस्थापन मात्र कामगार कायदे पायदळी तुडवीत आहे. कामगार न्यायालयाने सुद्धा संबंधित 70 कामगारांना बडतर्फ करता येणार नसल्याचे स्पष्ट केलेले आहे.

कामगारांकडे मागितला संघटनेचा राजीनामा
बैठकीत संजय कदम यांनी कामगारांची बाजू सक्षमपणे मांडली. त्यानंतर कामगार आयुक्तांनी 70 कामगारांना कामावर रुजू करून घेण्याचे व्यवस्थापनाला आदेश दिले. त्यानुसार सर्व कामगार सोमवारी कंपनीत कामावर गेले असता व्यवस्थापनाने कामगारांना कामगार संघटनेचा राजीनामा द्यावा व हमीपत्रे भरून द्यावीत. त्याशिवाय कामगारांना कामावर घेतले जाणार नसल्याची भूमिका घेतल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे सर्व कामगार अजूनही बाहेरच आहेत. लुमॅक्सचे मनुष्यबळ विकास विभागाचे अधिकारी संदीप कुंभार यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.