जळगाव – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन अडीच वर्ष झालीत. गेल्या अडीच वर्षात शेतकरी हवालदिल झाला आहे. विद्यार्थी मोर्चे काढताहेत.धान्य खरेदी नाही. वीजेचा प्रश्न गंभीर झाला आहे. एवढं सारं असतांना या महाविकास आघाडी सरकारला काहीही देणेघेणे राहीले नाही. मुके, बहिरे, आंधळे
असलेले हे महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे गांधीजींची तीन माकडे असल्याचा घणाघातील हल्ला भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी आज जिल्हा बैठकीत केला. दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ४० प्लसची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
भाजपाची जिल्हा बैठक जीएम फाऊंडेशनच्या कार्यालयात शुक्रवारी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे हे होते. यावेळी मार्गदर्शन करतांना भाजपाचे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी सांगितले की, इतिहासात कधी नव्हे तो एवढे वाईट दिवस या महाविकास आघाडी सरकारच्या काळात आले आहे. गैरव्यवहारामुळे हे सरकार उघडे पडले आहे. रोज या सरकारचे वाभाडे निघत आहेत. राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ऐकुन घेतले जात नाही. या सरकारला कुणाशीही काहीही देणेघेणे नाही अशी टिका आमदार महाजन यांनी केली. राज्यात भाजपा विरोधी पक्ष म्हणुन प्रभावीपणे काम करीत आहे. आपल्याला अनुकूल परिस्थीती आहे. उणीवा जनतेसमोर मांडुन सरकारला सळो की पळो करून सोडा असे आवाहन आ.
महाजन यांनी केले.
मुख्यमंत्र्यांची गिनीज बुकात नोंद करा
अडीच वर्षापासून राज्याचे मुख्यमंत्री मंत्रालयाची पायरी देखिल चढले नाही. कोरोना कमी झाला तरी मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाही. त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री कोण हेच जनतेला माहिती नाही असे झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या या मुख्यमंत्र्यांची गिनीज बुकात नोंद करावी अशी टिकाही आमदार महाजन यांनी केली.
राऊतांचा पोट मोकळं होत नाही
राज्यात आरोपप्रत्यारोपाच्या आडुन असंसदीय भाषा वापरली जात आहे. लोकप्रतिनीधी असलेल्यांनी तारतम्य ठेवले पाहिजे. सध्याच्या काळात शिवसेनेच्या संजय राऊतांचा ताबा सुटलेला आहे. एखाद्याचे जसे तंबाखु किंवा विडी पिल्याशिवाय पोट मोकळे होत नाही तसे राऊतांचे झाले आहे. रोज सकाळी समोर आल्याशिवाय त्यांचे पोट मोकळेच होत नाही असा टोलाही आमदार गिरीश महाजन यांनी लगावला.
Prev Post