सावदा : सावदा शहरासह ग्रामीण भागात मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करणार्यांविरोधात महावितरण कंपनीने धडक मोहिम सुरू केली असून आठवडाभरात 36 वीज मीटर जप्त करण्यात आले असून 44 वीज चोरट्यांविरोधात कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ज्या वीज वाहिनीवर अधिक वीज गळती आहे, अशा वाहिनी परीसरातील ग्राहकांविरोधात कारवाई केली जात आहे. या कारवाईने वीज चोरांचे धाबे दणाणले आहे.
36 ग्राहकांची वीज ‘गुल’
ज्या वीज वाहिनीवर जास्त वीज गळती होत आहे अश्या वीज वाहिनीवर वीज गळती कमी करण्यासाठी सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांच्या आदेशानुसार व उपकार्यकारी अभियंता राजेश नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वीज चोरी करणार्यांविरुद्ध मोहिम उघडण्यात आली. या मोहिमेत प्रामुख्याने 0 ते 50 युनिट वापर असणार्या 230 ग्राहकांच्या मीटरची कसून तपासणी करण्यात आली. त्यात फेरफार असलेले 36 मीटर जप्त करून वीज जोडणी कापण्यात आली. विद्युत कायद्यानुसार शेजार्यांकडून अनधिकृतपणे वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुसर्या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे, मीटरची छेडछाड करणे, आकोडा टाकून वीज घेणे, सर्विस वायर बायपास करणे आदी प्रकारची कारवाईदेखील पथकाने केली.
तर आणखीन कडक कारवाई होणार
वीज ग्राहकांनी आपल्या मीटरमध्ये छेडछाड करू नये, आकोडे टाकून विजेचा वापर करू नये, मंजूर भारापेक्षा अधिक भाराने विजेचा वापर करू नये तसेच इतर वर्गवारीसाठी विजेचा वापर करू नये शिवाय अनधिकृतरीत्या विजेचा वापर करतांना आढळून आल्यास अशा ग्राहकांविरोधात विद्युत कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे उपकार्यकारी अभियंता राजेश नेमाडे म्हणाले. याबाबत त्यांनी कर्मचार्यांनादेखील तसे आदेश दिले आहेत.
यांच्या पथकाने केली कारवाई
वीज जोडणी कापण्यात आलेल्या ग्राहकांमध्ये सावदा शहरातील आठ, चिनावल शहरातील सात, बलवाडी सहा, निंभोरा चार, कळमोदा चार, रायपूर चार, मस्कावदसीम चार, रोझोदा तीन, दसनूर दोन, कोचूर, मोठा वाघोदा येथील प्रत्येकी एका ग्राहकचा समावेश आहे. दरम्यान ही कारवाई सहाय्यक अभियंता विशाल किनगे, योजना चौधरी, हेमंत चौधरी, सागर डोळे, योगेश चौधरी, मंगेश यादव, सचिन गुळवे, प्रसन्ना साळुंके, भूषण पाटील आदींच्या पथकाने केली.