‘महावितरण’च्या ध्येयांना केराची टोपली

0

बारामती । आम्ही एक व्यवसायिक कंपनी म्हणून सर्व आव्हाने स्विकारू आमच्या सर्व ग्राहकांना खात्रीचा आणि दर्जेदार विजपुरवठा स्पर्धात्मक आणि रास्त दरात देण्यासाठी आणि त्याद्वारे महाराष्ट्र राज्याच्या कृषी, औद्योगिक आणि सर्वांगिण आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी पुन: समर्पित करीत आहोत. आम्ही आमच्या कामकाजात प्रामाणिकपणा, सचोटी आणि पारदर्शकता ठेवून ग्राहकांना अधिक ग्राहकांना अधिक समाधान देण्यासाठी वचनबध्द आहोत. आम्ही ग्राहकांच्या हितासाठी आमच्या कार्यात तांत्रिक सर्वोत्तमता आणि वित्तीय परिपूर्णता आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, तसेच ही कंपनी सतत शिकून आपल्या कामगिरीत सुधारणा करीत राहील. आम्ही विजप्रणालीत सुधारणा करून फक्त प्रतिबंधात्मक देखभाल करण्यावर भर देऊ. आम्ही वीज चोरांवर कठोर कारवाई करून वीज चोरीला पायबंद घालू आणि वीज बचतीच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देऊ. आम्ही जनतेच्या सामाजिक जीवनमानाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करून आम्ही सामाजिक बांधिलकी पूर्ण करू, असे ध्येय धोरण महावितरणने तयार केले आहे. त्याचा ठळक अक्षरात बारामती महावितरण कार्यालयात बोर्ड ही लावण्यात आला आहे. परंतु या ध्येयांचा आणि महावितरणच्या कारभारचा ताळमेळ बसत नसल्याचे दिसून येते. या ध्येयांना बारामतीत केराची टोपली दाखवल्याचे दिसून येते.

बिलाचा भरणा करण्यासाठी रांगा
शेतकर्‍यांकडे असलेली करोडो रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसात महावितरणने जोरदार मोहीम सुरू केली आहे. वर्षानुवर्षापासून शेतकर्‍यांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी गेली दहा वर्ष या कंपनीने कोणतेही का प्रयत्न केले नाहीत? असा सवाल केला जातो आहे. गेल्या तीन दिवसात वीजेची थकबाकी भरण्यासाठी शेतकर्‍यांच्या रांगा लागत आहेत. विद्युतपुरवठा तोडल्यानंतर कठोर कारवाईच्या आदेशामुळे शेतकरी थकबाकी भरू लागले आहेत. यावरूनच थकबाकी वसुलीसाठी महावितरण गांभिर्याने प्रयत्न करीत नव्हते हे यावरून दिसून आले.

धनदांडगेही भरू लागले थकबाकी
बारामती व इंदापूर तालुक्यातील धनदांडग्या शेतकर्‍यांकडे असलेली थकबाकी आता वसूल होत आहे हे आश्‍चर्यजनक आहे. याचे महत्त्वाचे कारण महावितरणने घेतलेली कठोर भूमिका. दौंड तालुक्यात शेती असलेल्या पण पुणे जिल्ह्याच्याजवळ राहणार्‍या माजी खासदाराने 5 लाखाची थकबाकी धनादेशाद्वारे भरली. हे याचे जळजळीत उदाहरण आहे.

ग्राहकांची लूट
सोयीसुविधांच्या पंगतीत धनदांडगे खर्‍या गरजूला वर येऊ देत नाहीत हे वारंवार सिध्द झाले आहे. महावितरणने ही मोहीम राबविल्यामुळे थकबाकी वसूल होत आहे. मात्र त्यासाठीची यंत्रणा महावितरणने उभी केली नाही. पर्यायाने लोकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. 100 युनिट, 200 युनिट, 300 युनिट असे स्लॅब पाडून महावितरण आपल्या ग्राहकांची लूट करीत आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सर्वसामान्यांना धरले जाते वेठीस
आपल्या ध्येयाच्या अगदी विरुद्ध कारभार महावितरणचा सुरू आहे. आजही शेतकर्‍यांकडून रोहित्रासाठी वर्गणी मागितली जाते. हे वारंवार सिद्ध झाले आहे. भलेमोठे ध्येय असलेली कंपनी सर्वसामान्यांना बर्‍याचदा वेठीस धरत असते. याबाबतच्या सातत्याने तक्रारी येत असतात. आता शेतकर्‍यांनी थकबाकी भरल्यामुळे नियमीत वीजपुरवठा करणे हे कंपनीचे काम आहे. हे विसरून चालणार नाही. शेतकर्‍यांनी थकबाकी भरल्यामुळे महावितरण कंपनीची जबाबदारी अधिक वाढलेली असून ती नाकारता येणार नाही.