पुणे । पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील 6 लाख 78 हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांकडे असलेली 132 कोटी 48 लाख रुपयांची थकबाकी शून्य करण्यासाठी पुन्हा एकदा शून्य थकबाकी मोहिम मंगळवारपासून आक्रमक करण्यात आली आहे. मात्र या मोहिमेत सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. शंभर-दोनशे रूपयाचे एक बील भरलेले नसले तरी वीज पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. दंड आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यात होत असलेला विलंब यामुळे अनेकजण त्रस्त झाले आहेत.
ताकसांडे यांनी साधला थेट संवाद
मोहिमेत सहभागी झालेल्या पुणे परिमंडलातील सुमारे 1400 अभियंते, अधिकारी व जनमित्रांशी सेनापती बापट मार्गावरील प्रकाशभवन येथे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी थेट संवाद साधला. ताकसांडे म्हणाले, की सद्यस्थितीत वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरणसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शून्य थकबाकी मोहिमेत गेल्या नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये तसे चांगले काम झाले. परंतु या महिन्यात संपूर्ण थकबाकी शून्य करण्याच्या ध्येयानेच काम करणे आवश्यक आहे व थकबाकी असल्यास वीजपुरवठा खंडितच होणार असा संदेश या मोहिमेद्वारे थकबाकीदारांना द्यावा. जबिलाची माहिती उपलब्ध होईल.
रक्कम न पाहता वीज तोडणार
पुणे परिमंडलातील पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यात सद्यस्थितीत 6 लाख 78 हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे 132 कोटी 48 लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. आजपासून आक्रमपणे सुरु झालेल्या शून्य थकबाकी मोहिमेत अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सर्व उपविभाग व शाखा कार्यालयांचे प्रमुख अभियंते, लेखा अधिकारी तसेच हजारो जनमित्र सहभागी झाले होते.
नागरिक त्रस्त
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर थकीत वीजबिलांचा भरणा करणे, संबंधित कार्यालयात पावती दाखवून, रिकनेक्शन चार्जेस भरून वीजपुरवठा सुरु करून घ्यावा लागणार आहे. याशिवाय तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध तात्काळ फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महाविरतणच्या या मोहिमेत शंभर-दोनशे रूपयाचे एक बील भरलेले नसले तरी वीज पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. दंड आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यात होत असलेला विलंब यामुळे अनेकजण त्रस्त झाले आहेत.