वाघोली : राज्य आणि केंद्र सरकारकडून विविध सवलतींसह मध्यम व लघुउद्योगांना प्राधान्य देण्यात आले आहे. असे असले तरी महावितरण विद्युत कंपनीकडून विद्युत बिलामध्ये आकारण्यात येणार्या विविध अन्यायकारक शुल्कामुळे लघुउद्योजक संकटात सापडला असून अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. हवेली, शिरूर तालुक्यात मोठ्याप्रमाणावर सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग आहेत. या उद्योगाला महत्त्वाचे स्थान आहे. बेरोजगारांना यामधून रोजगार मिळतो. यामधून अनेक कुटुंब उपजीविका करता बँकांकडून कर्ज काढून लघुउद्योग चालवले जातात. अनेक लघुउद्योग मोठ्या कंपन्यांवर अवलंबून असतात तर मोठ्या कंपन्यादेखील लघु उद्योगावर अवलंबून असतात.
आर्थिक लूट
सध्या सूक्ष्म, मध्यम लघु उद्योग मंदीच्या वातावरणात असून विद्युत बिलामधील वाढत्या विविध शुल्कामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने लघु उद्योगांना दिलेल्या सवलतीचा काहीही फायदा होत नसून विद्युत कंपनीकडून विविध आकारणी शुल्क आकारून लघुउद्योजकांची आर्थिक लूट केली जात आहे. आकारण्यात येणारे वेगवेगळे शुल्क बंद करावे, अशी मागणी जीके फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप कटके व श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्पेश जाचक यांनी केली आहे.
प्रती युनिट 15 रुपयांचा भुर्दंड
बँक कर्ज, कामगार, मशनरी देखभाल दुरुस्ती आदींसह विद्युत बिल याचा वाढता खर्च यामुळे छोटे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. शासनाकडून लघुउद्योगांना प्रोत्साहन देऊन सवलती देण्यात आल्या असल्यातरी प्रत्यक्षात मात्र त्याचा फायदा होत नसल्यामुळे मोठा सामना त्यांना करावा लागत आहे. लघु उद्योजकांना 4.75 प्रती युनिट आकारणी असतांना विविध अन्यायकारक शुल्क आकारून 14 ते 15 रुपये प्रती युनिटचा भुर्दंड उद्योजकांना सोसावा लागत आहे.