मुख्य अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली मागणी
पिंपरी : मुलांच्या परीक्षा सुरु व उन्हाळा सुद्धा सुरु झाला आहे, त्यामुळे विजेची मागणी देखील वाढली आहे. त्यासाठी पुणे परिमंडळामध्ये अखंडित वीज पुरवठा कसा होईल याबाबतचे नियोजन करावे. या काळात वीज बिलाच्या वसुलीचा बागलबुवा न करता परिमंडलातील संबंधित सर्व विभागांना परीक्षा काळात व उन्हाळ्यात अखंडित वीज पुरवठा करणे बाबत योग्य ती सूचना करावी. खंडित वीज पुरवठ्यामुळे महावितरणचेच आर्थिक नुकसान होते याकडे लक्ष द्यावे. तसेच पावसाळ्यापूर्वी दुरूस्तीची कामे करून घ्यावीत, अशी मागणी विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांनी मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सौंदणकर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, पावसाळापूर्व देखभाल व दुरुस्ती यासाठी एप्रिल महिन्यातच कामे आटोपण्यासाठी अधिकार्यांची लगबग राहील. नवीन बदलून येणार्या अधिकार्याला जूनमध्ये काम करताना परिसर नवीन असल्याने अडचणीचा सामना करावा लागू शकतो. यामुळे पावसाळापूर्व देखभाल व दुरुस्ती यासाठी विलंब होऊ शकतो. पावसाळ्याला सुरुवात होण्याआधी पुणे परिमंडलातील दुरुस्ती ची कामे आपल्याकडे असलेल्या निधीतून प्राधान्याने पूर्ण करावीत. जेणेकरून पावसाळ्यात महावितरणच्या कामगार व अधिकारी यांच्यावर कामाचा अतिरिक्त भार येणार नाही. तसेच येणार्या पावसाळ्यात खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळापूर्व देखभाल व दुरुस्ती यासाठी नियोजन व सभेचे आयोजन करावे. यासाठी पुणे जिल्हा विद्युत सनियंत्रण समिती सदस्य यांना आमंत्रित करावे.