‘महावितरण’ने शिडीगाड्या सुरू कराव्यात

0

विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य सौंदणकर यांची मागणी
पिंपरी-चिंचवड : पुणे परिमंडळ क्षेत्रात तुटवडा निर्माण झालेले सिंगल फेज व थ्री फेज मीटर मोठया संख्येने मागवून घ्यावेत, तसेच तसेच बंद केलेल्या शिडी गाड्या पुन्हा सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समितीचे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांनी पुणे येथील प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांच्याकडे केली आहे.

दरमहा पावणेदहा लाख नुकसान
याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे परिमंडळात 15 हजार सिंगल फेज मीटर्सचा तुटवडा आहे. तसेच थ्री फेज व टी.ओ.डी. मीटर्सचा देखील तुटवडा जाणवत आहे. पुणे परिमंडऴात 15 हजार मीटर्सची कमतरता आहे. जर हे सर्व मीटर्स लागले गेले असते, तर एका ग्राहकामागेर 65 रुपये एवढा फिक्स चार्जेस आहे. हा 15 हजार मीटर्सला जोडला तर महिना 9 लाख 75 हजार महसूल महावितरण कंपनीस मिळाला असता. मात्र महावितरण हा महसूल विनाकारण बुडवत असल्याचे दिसत आहे. शासनाने प्रादेशिक संचालक कार्यालयाची निर्मिती मुऴातच महावितरणच्या कामात गतिमानता येण्यासाठी केली गेली. मात्र यास हरताळ फासला गेला आहे.

शिडीवरील खर्च नगण्या
वीज खंडित झाल्यास काही क्षणात पोचणार्‍या शिडी गाड्या पैसा वाचविण्यासाठी बंद केल्या गेल्या. याचा नाहक त्रास ग्राहकांना सोसावा लागतो. चार आणे वाचविण्यासाठी एक रुपयाच्या विजेचे नुकसान होते. पुणे विभागात 100 शाखा कार्यालयात 100 गाड्या महिना 30 हजार रुपये दराने धरल्या तर 30 लाख रुपये होतात. हे पुणे महसुलीच्या (1100 कोटी) तुलनेत 0.027 एवढा नगण्य आहे याचा सारासार विचार करून पुन्हा शिडी गाड्या सुरु करण्यात याव्यात.