महावितरणमधील पदोन्नत्या लवकरच होणार

0

पुणे : विभागीय कार्यालय ते मुख्य कार्यालयांपर्यंत गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यासाठी प्रमोशन पॅनेल नेमण्यात येणार आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबाजवणी करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा सहायक लेखापालांना होणार आहे.महावितरण प्रशासनामध्ये कामगार, अभियंते, अधिकारी आणि प्रशासकीय कर्मचारी यांच्या पदोन्नत्या रखडल्या आहेत. यासंदर्भात विविध कामगार संघटनांनी पाठपुरावा केला होता. मात्र, त्यामध्ये अपेक्षित यश आले नाही.

साडेचारशे पदांची पदोन्नती प्रलंबित

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा, सरचिटणिस कृष्णा भोयर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यावेळी संजीव कुमार यांनी हे आश्वासन दिले. उच्चस्तर लिपिक, लेखा ते सहाय्यक लेखापाल या प्रशासनाच्या महसूलाशी संबधित असलेल्या तब्बल साडेचारशे पदांची पदोन्नती गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत, ही बाब शर्मा आणि भोयर यांनी निदर्शनास आणून दिली. या सर्व पदोन्नत्या मार्गी लावण्यासाठी प्रमोशन पॅनेल तयार करण्यात येणार आहे, असे आश्वासनही संजीव कुमार यांनी यावेळी दिले, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणिस कृष्णा भोयर यांनी दिली.