जळगाव। बिलींग, वसुली, वीज चोरा विरुध्द कारवाई, ग्राहक सुसंवाद व देखभाल दुरुस्ती या सर्व मानकांच्या बाबतीत अधिकारी-कर्मचार्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावणे गरजेचे आहे.
महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागाची आर्थिक स्थिती इतर विभागाच्या तुलनेत असमाधानकारक आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी सर्वांनी पुर्ण कार्यक्षमतेने काम करावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सुचक इशारा औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी दिला. जिल्ह्यातील सर्व अभियंता अधिकारी कर्मचार्यांची आढावा बैठक महावितरणच्या लघु प्रशिक्षण केंद्र, अजिंठा रोड, जळगांव येथे आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी बकोरिया बोलत होते. या बैठकीस मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, अधिक्षक अभियंता दत्तात्रय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वीजचोरींवर बसणार आळा
ग्राहकांशी सुसंवाद वाढविणे आवश्यक आहे. त्या हेतुने ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी प्राधान्याने पुर्ण करावी. वीज बिल थकीत असलेल्या सर्व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, नगरपालिकांच्या पथदिवे योजनांचा वीज पुरवठा खंडीत करावा. बिलींगची कामे वेळेत पुर्ण करावीत. शासकीय निवासस्थानाची वीज जडणी वैयक्तिक कर्मचार्यांचे नावाने द्यावी. थकबाकीदार वीज ग्राहकांच्या नावाना जाहिर प्रसिध्दी द्यावी. वीज चोरीला आळा घालण्यासाठी वीज चोरावर कायदेशीर कारवाई करुन गुन्हे दाखल करावेत. मीटर रिडींगमध्ये फेरफार करणार्या मीटर रिडींग एजन्सी विरुध्द कठोर कारवाई करुन त्यांना काळ्या यादीत टाका व मीटर रिडर, मीटर रिडींग एजन्सी विरोधात गुन्हे दाखल करावेत. अश्या सुचना देण्यात आला.