महावितरण कार्यालयात तोडफोड

0

येरवडा । खराडी भागात महावितरण कार्यालयाच्या उपकेंद्राची एका व्यक्तीने तोडफोड करून अधिकार्‍यांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी खराडी पोलीस चौकीत त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अतुल रासकर (रा. खराडी) असे उपकेंद्र फोडलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्याविरोधात सहाय्यक अभियंता राहुल मच्छिंद्र पालके यांनी फिर्याद दिली आहे.

पालके यांना शिवीगाळ
खराडी येथील महावितरण उपकेंद्रात राहुल पालके हे सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असून ते कार्यालयातून कामानिमित्त बाहेर निघाले असता बाहेरील रूममधील महिला कर्मचार्‍यांशी रासकर हे वाद घालत असल्याचे दिसल्यावर त्यांनी विचारणा केल्यावर रासकर याने पालके यांना शिवीगाळ केली. यावेळी तुझी अडचण, समस्या काय? अशी विचारणा केल्यावर रासकर याने पुन्हा त्यांना शिवीगाळ केली. कार्यालयातील टेबलच्या काचा फोडल्या. त्यानंतर खुर्च्याने दोन खिडक्यांच्या काचा फोडल्या. यावेळी त्याचा हातही रक्तबंबाळ झाला होता.

कार्यालयात प्रथमच अशी घटना
यावेळी कर्मचार्‍यांनी खराडी पोलीस चौकीत घटनेची माहिती पोलिसांना दिली. येथील कर्मचारी पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी रासकर यास समजले असता तो आपण काही केलेच नाही. या थाटात स्वतः होऊन पोलीस चौकीत जाऊन हजर झाला. कार्यालयात प्रथमच अशा प्रकारची घटना घडल्याने महिला कर्मचार्‍यांसह इतर कर्मचारीही भयभीत झाले होते. घटनेची माहिती कार्यकारी अभियंता किशोर पाटील यांना समजताच त्यांच्यासह वडगाव शेरी विभागाचे होनवार, एम.कांबळे यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी येथे घटनेची पाहणी केली. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप साळुंखे, राजेश्‍वरसिंह रजपूत हे करत आहेत.

तक्रारीची दखल घेतली नाही
दरम्यान रासकर हा त्याच्या घरातील मीटर बदलून देण्यासाठी कार्यालयात चकरा मारत होता. त्याच्या तक्रारीची दखल न घेतल्याने त्याने चिडून हा प्रकार केल्याची चर्चा परिसरात होती.

कर्मचारी झाले भयभीत
एवढ्यावरच न थांबता त्याने कार्यालयातील घड्याळदेखील फोडले. तसेच फर्निचरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घटनेनंतर कार्यालयात खुर्च्या, काचा फुटलेल्या अवस्थेत अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्या होत्या. यावेळी रासकर याचे भयानक रूप पाहून महिला कर्मचारी भयभीत झाल्या होत्या. या घटनेत जवळपास अंदाजे 40 ते 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज पालके यांनी वर्तविला आहे.