प्रशासकीय सेवेबद्दल जिल्हाधिकार्यांचा सत्कार
सांगवी : प्रशासकीय सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते तीन वेळा सत्कार करण्यात आला. तसेच राज्यात व राज्याबाहेर विविध ठिकाणी माझा सत्कार करण्यात आला. मात्र माझ्या महाविद्यलयाने केलेला गौरव मला जास्त आनंद देणारा वाटतो, असे मत मध्यप्रदेश मधील उज्जैनचे जिल्हाधिकारी संकेत भोंडवे यांनी व्यक्त केले. प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ठ सेवेबद्दल पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला. त्यावेळी सरकारला उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, 91 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, तामिळनाडू येथील ई-गव्हर्नन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पाटील, अर्जुन पुरस्कार विजेते गोपाळ देवांग, सचिन इटकर, सुमन शर्मा, भाग्यश्री पाटील, स्मिता जाधव, जिल्हाधिकारी संकेत भोंडवे यांच्या मातोश्री सुमन भोंडवे, पत्नी हर्षदा भोंडवे आदी उपस्थित होते.
अपार मेहनतीमुळे यशसवी झालो
संकेत भोंडवे म्हणाले की, सावित्रीबाई फुले विद्यापीठातील जयकर ग्रंथालय आणि सांगवी या ठिकाणी अभ्यास केला. कोणताही क्लास लावला नाही. अपार मेहनत आणि मनातील प्रचंड इच्छाशक्ती, आई-वडील व गुरुजनांचा आशीर्वाद यांच्या जोरावर लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालो. समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा मनात होती, जिल्हाधिकारी झाल्यानंतर ती पूर्ण करीत आहे. प्रामाणिकपणे केलेल्या कामाचा गौरव होताना मनातून आनंद होतो. प्रशासनातील उत्कृष्ठ सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते तीन वेळा सत्कार झाला. पण माझ्या महाविद्यालयाने केलेल्या गौरवाचा आनंद काही औरच आहे.
स्नेहल दामले आणि नीता मोहिते यांनी जिल्हाधिकारी संकेत भोंडवे यांची मुलाखत घेतली. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयातील आपल्या जुनी आठवणींना संकेत भोंडवे यांनी यावेळी उजाळा दिला. अभ्यास करत असताना घेतलेले टपरीवरचा चहा, वडापाव, मित्रांबरोबरच्या सहली, कार्यक्रमांमध्ये घेतलेला सहभाग, यूपीएससी परीक्षेची तयारी करताना केलेला अभ्यास, आलेल्या अडचणी त्यांच्यावर केलेली मात अशा सर्व आठवणींचा त्यांनी उजाळा दिला.
स्वप्नांचा पाठलाग करा
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, स्वप्न पाहा आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करा. स्वप्न पूर्ण होण्यासाठी मेहनत करावी लागते. त्यासाठी मनापासून कष्ट केल्यास यश नक्कीच मिळते. सर्वजण जात असलेल्या रोजच्या वाटेने न जाता स्वतःची वेगळी वाट निर्माण करा. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या सायली शेळके (रोइंग), स्नेहल शेळके (रोइंग), स्वप्नील ढमढेरे (नेमबाजी) यांचा देखील यावेळी महाविद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला.