२०६० स्वयंचलित हवामान यंत्रे कार्यान्वित
मुंबई : लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी योजना महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केली आहे. ‘महावेध’ यानावाने स्वयंचलित हवामान यंत्रणेमार्फत आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती, अंदाज उपलब्ध होणार असून त्यानुसार पिकांचे योग्य व्यवस्थापन कसे करावे आणि नुकसान कसे टाळावे याचे तंत्र शेतकऱ्यांना सहज साध्य होणार आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रत्येक महसूल मंडळात एक अशी 2060 स्वयंचालित हवामान केंद्रे स्थापन केली असून त्याद्वारे गावस्तरापर्यंतच्या शेतकऱ्याला हवामानाचा अचूक अंदाज आणि माहिती प्राप्त होणार आहे.
हवामानाशी संबंधित सूचना आणि अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी या उद्देशाने अशी एक विकेंद्रित व्यवस्था उभी करण्याची ही संकल्पना होती असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सध्याची हवामानविषयक यंत्रणा संपूर्ण राज्यातील हवामानाची एकत्रित माहिती देण्यापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर हवामानाचे अचूक अंदाज वर्तविणे शक्य होत नाही. उदाहरणार्थ,एखाद्या गावात काही भागात पाउस तर लगतच्या गावात मात्र कोरडे हवामान एकाच वेळी आढळते. या स्वयंचलित हवामान यंत्रणेमुळे हवामानाशी संबंधित परिपूर्ण आणि अचूक माहिती मिळणार आहे. हवामानाची खरी स्थिती वेळेआधी प्राप्त होत असल्याने शेतकऱ्यांना पावसाचा, गारपीटीचा अंदाज आधीच मिळेल आणि त्यानुसार ते संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाय योजना करू शकतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आपल्या राज्यात शेती हवामानावर आधारित आहे. गेल्या काही वर्षातील हवामानातील वाढत्या बदलामुळे अवेळी पाऊस, गारपीट, वादळ, यांचा तडाखा पिकांना बसून त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना देखील बसला आहे. ही स्वयंचलित हवामान यंत्रणा स्कायमेट या हवामानाचे अंदाज वर्तविणाऱ्या कंपनीच्या सहकार्याने पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप पीपीपी तत्वावर बसविण्यात आली आहे. सध्या राज्यात हवामानाचे अंदाज वर्तविणाऱ्या आठ मोठ्या कंपनी आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून हवामानाविषयी सर्वसाधारण माहिती आणि अंदाज वर्तविले जातात,असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
या स्वयंचलित हवामान यंत्रणेमुळे वाऱ्याची नेमकी गती किती आहे आणि ते कोणत्या दिशेने वाहत आहेत ते कळेल, तसेच हवेतील तापमान, सापेक्ष आर्द्रता पावसाचे प्रमाण,याविषयीची माहिती शेतकऱ्यांना देखील गावनिहाय कळेल. ज्या ठिकाणी अशी यंत्रणा कार्यरत झाली आहे तेथे हवामानाची अचूक माहिती प्रत्येक दहा मिनिटांच्या अंतराने एकत्रित करण्याची व्यवस्था पुणे येथील कृषी महाविद्यालयात करण्यात आली आहे. ही माहिती लवकरच शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करण्यासाठी योग्य ती पावले आम्ही उचलणार आहोत,असे मुख्यमंत्री म्हणाले.
महसूली मंडळांच्या ठिकाण हि स्वयंचलित यंत्रणा बसविल्यामुळे स्थानिक स्तरावर शेतकऱ्यांन माहिती देणे सोपे जाणार आहे. जसे, जळगावात जर अवेळी पावसाची शक्यता असेल तर नाशिकच्या शेतकऱ्याला या माहितीचा तसा काहीच उपयोग नाही. म्हणून, पुण्याच्या महाविद्यालयात यातील विशिष्ट माहिती वेगळी करून ती त्या संबंधित भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था केली जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले कि सरकारने यापूर्वीच ‘एम-किसान’ सल्लागार यंत्रणा अमलात आणली असून त्याद्वारे ५० लाख शेतकऱ्यांपर्यंत मोबाईलच्या माध्यमातून हवामानासंबंधी सामान्य माहिती पोहचविली जात आहे. परंतु राज्यात १.३७ कोटी शेतकरी आहेत.त्यापैकी केवळ ५० लाख शेतकरीच या व्यवस्थेवर नोंदले गेले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना ही व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात एलइडी स्क्रीन उभारून त्याद्वारे हवामानाची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे,असे श्री. फुंडकर म्हणाले.
याशिवाय, काही कृषी अधिकाऱ्यांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड दिला जाईल म्हणजे ते जिल्ह्यांच्या वेबसाईट वर माहिती टाकू शकतील आणि ग्रामपंचायत कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना हवामानाची पूर्वसूचना देऊ शकतील.
माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक श्री. ब्रिजेश सिंह म्हणाले की, या यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांना ग्रामस्तरापर्यंत हवामानाच अचूक अंदाज मिळणार आहे. १२ चौरस किमी क्षेत्रासाठी एक हवामान केंद्र स्थापित केले जाणार असल्याने सूक्ष्म स्तरावर हवामानाचा नादाज वर्तविणे शक्य होणारा आहे.
या स्वयंचलित हवामान यंत्रणेच्या माध्यमातून संकलित माहितीचा उपयोग करून विशिष्ट क्षेत्रांसाठी योग्य कृषी व्यवस्थापन करण्याचा सल्ला देणे सोपे होईल. नैसर्गिक संकटांच्या काळात आपत्ती व्यवस्थापन करणे देखील सहज शक्य होईल. पीक वीमा योजनांचे व्यवस्थित नियोजन करता येईल आणि हवामानाच्या माहितीची बँक तयार करता येणार आहे.