महासत्तांचे असेही शीतयुद्ध

0

वॉशिंग्टन : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी मॉस्को आणि रशियातली अन्य शहरांमधील अमेरिकेच्या दुतावासांमधील ७५५ कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अमेरिकेतील अध्यक्ष निवडणुकीच रशियाने केलेल्या हस्तक्षेपामुळे तसेच अमेरिकेने रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधामुळे दोन्ही देशात तणाव वाढतच जात आहे. अमेरिका आणि रशियाने एकमेकांचे राजनैतिक अधिकारी व राजदूतांची हाकालपट्टी या आधीही केली आहे. परंतु प्रस्तुत दुतावासांमधील कर्मचाऱ्यांची इतकी मोठी कपात १९१७ च्या रशियन राज्यक्रांतीनंतर पहिल्यांदाच होत आहे.

पुतिन यांनी रोशिया-१ वाहिनीला सांगितले की अमेरिकेत रशियन दुतावास आणि वाणिज्य दुतावास यांच्यामधील कर्मचाऱ्यांची संख्या आहे तेवढीच अमेरिकी दुतावास कर्मचाऱ्यांची संख्या रशियात असेल. आता १२०० लोक अमेरिकेच्या रशियातील दुतावासांमध्ये काम करीत आहेत. अमेरिकेने आर्थिक निर्बंध घातल्याने काटकसर करण्यासाठी आणखी काही निर्णय घ्यावे लागतील असे संकेत पुतिन यांनी दिले आहेत. रशिया सिरीया, इराणसारख्या देशांना मदत करीत आहे, हे अमेरिकेला मान्य नाही. त्यामुळे रशियावर आर्थिक निर्बंध घातले आहेत. तिकडे इस्टोनिया, जॉर्जिया आणि मॉन्टेनेग्रो या देशांमध्ये अमेरिकाही हस्तक्षेप करीत आहे, असा रशियाचा प्रतिवाद आहे.

सेंट पिटर्सबर्ग, येकातेरीनबर्ग आणि व्हादिवोस्तोक या शहरांमधील अमेरिकी दुतावासांनाही रशियाच्या निर्णयाचा फटका बसलेला आहे. प्रसिद्ध तज्ज्ञ आणि माजी राजदूत मायकेल मॅक फाउल यांच्या मते या निर्णयामुळे अमेरिकेला काहीही फरक पडणार नाही मात्र रशियन लोकांना अमेरिकेचा व्हीसा मिळण्यासाठी काही दिवस उशी होईल इतकंच.