कल्याण : कल्याण रेती बंदर परिसरातील रेती व्यावसायिकांच्या विरोधात जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार कल्याम डोंबिवली महापालिकेचे आयुक्त व अधिकारी वर्गाने कारवाई केली. 72 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान केले.
महापालिकेच्या आयुक्तांसह अधिकारी वर्गाला कारवाईत जप्त केलेली मालमत्ता नष्ट करण्याचा अधिकारा आहे का असा संतप्त सवाल अपक्ष नगरसेवक काशीब तानकी यांनी आज पार पडलेल्या महासभेत उपस्थितीत केला. ही कारवाई जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याचे आयुक्त व महापौरांनी स्पष्ट करताच जिल्हाधिकारी खून करायला सांगतील तुम्ही कराल का असा प्रतिसवाल उपस्थित करुन तानकी यांनी मोठय़ा आवाजात त्यांचे मुद्दे मांडून प्रशासनाकडे जाब मागितला. तसेच सभेचे कामकाज रोखून धरण्याचा इशारा दिला.
अत्यल्प कालावधीत नोटिस देऊन कल्याण रेतीबंदरमधील रेती उपसा करणार्या रेती व्यावसायिकांच्या विरोधात जिल्हाधिकार्यांनी कारवाई केली. जिल्हाधिकारी कारवाईसाठी महापालिका आयुक्त, महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी घेण्यात आले होते. रेती व्यावसायिकांचे ड्रेझर्स, संक्शन पंप, क्रेन आदी सगळे साहित्य कारवाई दरम्यान जप्त करण्यात आले. ते जप्त करुन त्याचे गॅस कटरने तुकडे करुन खाडीत फेकून देण्यात आले. तसेच एक कोटी 94 लाख किंमतीची लिलावात घेतलेली रेती देखील जप्त करुन ती खाडी पुन्हा फेकून दिली गेली. कोटय़ावधीची मालमत्ता जप्त करुन ती नष्ट करण्याचा अधिकार महापालिका अधिकार्यांना कोणी दिला. इतकेच नाही तर या परिसरातील 15 बांधकामांना नोटिसा दिल्या गेल्या. त्या ठिकाणी राहत असलेल्या सात हजार नागरीकांचा पाणी व वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे सात हजार नागरीकांचे हाल झाले. या ठिकाणी तबेले आहेत. त्यात 2 हजार पेक्षा जास्त म्हशी आहे. दुधाचा मोठा व्यापार आहे. रेती कारवाईच्या विरोधात मी नाही. कारवाई करीत असताना त्यात इतर लोक भरडले गेले. चुकीच्या पद्धतीने कारवाई केली गेली.
मी रेती व्यावसायिक नाही. त्याठिकाणी असलेला बहुतांश वर्ग हा अल्पसंख्याक मुस्लीम समाज आहे. रेती व्यावसायावर पाच हजार जणांचा रोजगार आहे. त्यांचे झालेल नुकसान व रोजगार महापालिका भरुन देणार आहे का असा संतप्त सवाल उपस्थित करुन समाजाला न्याय देण्यासाठी आपण भांडत असल्याचे तानकी यांनी सभागृहात स्पष्ट केले.