महासभेत जोडपत्राद्वारे भाईटे शाळा उत्कर्ष शाळेस द्या

0

जळगाव। महानगर पालिकेची महासभा शनिवार 29 रोजी होणार आहे. या महासभेत एम.जे. कॉलेज जवळील महानगर पालिकेची भोईटे शाळा ही उत्कर्ष मतिमंद विद्यालयास देण्याचा ठराव जोडपत्राद्वारे ठेवण्यात यावा अशी मागणी भाजपा नगरसेवक रविंद्र पाटील यांनी महापौर व आयुक्तांकडे 25 एप्रिल रोजी केली आहे. खोटे नगर जवळील जीवराम नगर येथील उत्कर्ष मतिमंद विद्यालय 1989 पासून सुरू आहे. या शाळेत शहरातील सर्वच भागातील मतिमंद विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. शाळेत एकूण 107 विद्यार्थी असून शासनाकडून केवळ 40 विद्यार्थ्यांची अनुदान तत्वावर मान्यता दिली आहे. उर्वरीत 67 विद्यार्थ्यांकरीता शासनाकडून कोणत्याही स्वरूपाचे अनुदान मिळत नाही.

संस्थेला विद्यार्थ्यांचा आर्थिकभार सोसणे अवघड झाले असून संस्थेकडे एकच स्कूल बस असल्याने आयोध्या नगर, कांचन नगर, खेडी नाका, ममुराबाद नाका, शिवाजी नगर, शनिपेठ, मेहरूण, दौलत नगर, वाघ नगर, रामानंद नगर, निमखेडी शिवार, बांभोरी, हरी विठ्ठल नगर, पिंप्राळा परिसरातील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल बसला दोन ट्रिपमध्ये फिरावे लागते. शाळेत जाण्यासाठी 100 विद्यार्थी-विद्यार्थींना जीव मुठीत घेवून 8 ते 10 किलोमीटरचा प्रवास हायवेवर प्रवास करीत असतात. तसेच काही विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवा मिळण्यास बराच कालावधी जात असतो. यासर्व बाबींचा विचार करून शाळेस मध्यवर्ती ठिकाणी इमारत मिळणे आवश्यक आहे श्री. पाटील यांनी म्हटले आहे. या विद्यार्थ्यांचा बराचसा वेळ हा प्रवासात जात असल्याने त्यांना शिक्षण व प्रशिक्षण देण्यास कमी वेळ मिळत असल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे. तरी भाईटे शाळा उत्कर्ष मतिमंद विद्यालयास दिल्यास विद्यार्थ्यांना ने-आण करणे सोईचे होणार असल्याने महानगर पालिकेने उत्कर्ष मतिमंद विद्यालयास उपलब्ध करून द्यावी अशी विनंती रविंद्र पाटील यांनी केली आहे.