महासभेसाठी शहरातील केवळ ’30’ नगरसेवकांनी दिले प्रस्ताव

नगरसेवकांचे प्रस्ताव आलेच नसल्याने यांना विकासाची गरज नाही का ? नागरिकांचा सवाल

 

जळगाव : महासभेत प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागातील 10 लाखांच्या विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याने नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागातील 10 लाखांचे प्रस्ताव सादर करावे असे आवाहन महापौरांकडून करण्यात आले होते. परंतु महापौरांनी केलेल्या आवाहनानुसार फक्त तीसच नगरसेवकांनी आपले प्रस्ताव सादर केले असून उर्वरीत 38 नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विकास कामांचे प्रस्ताव सादर केलेले नाही.

नेहमी माझ्या प्रभागात कामे होत नाही, आम्हाला विकास कामांचे नियोजन करतांना विश्वासात घेतले जात नाही, असे सांगून विकास कामांसाठी भांडणार्‍या नगरसेवक महापौरांनी आवाहन केल्यानंतरही आपले प्रस्ताव सादर करीत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यशासनाकडून भविष्यात मिळणार्‍या निधीतून शहरातील विकास कामे व्हावीत, म्हणून या आठवड्यात होणार्‍या महासभेत विकास कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागातील दहा लाखांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या होत्या. मात्र, 45 नगरसेवकांनी महासभेचा अजेंडा तयार होण्याच्या पुर्व संध्येपर्यंत आपले प्रस्ताव सादर केलेले नाहीत.

गेल्या महासभेच्या वेळी देखील महापौरांनी आपआपल्या प्रभागातील विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन नगरसेवकांना केले होते. त्यावेळी देखील बहुतांश नगरसेवकांनी वेळेत आपले प्रस्ताव सादर केलेले नव्हते. त्यामुळे नगरसेवकांनाच आपल्या प्रभागातील विकास कामांची आवश्यकता नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकी कडे नगरसेवकांकडूनच प्रस्ताव सादर केले जात नसतांना दुसरीकडे आपल्या प्रभागात विकास कामे होत नाहीत, असा आरोप कितपत योग्य अशी चर्चा आता मनपाच्या राजकीय वर्तुळात पसरली आहे.