महास्मारकांना विरोध थांबवा!

0

एखादं शुभकार्य होणार असेल तर त्याला काही तरी कारण पुढे करून अडथळे आणण्याचं काम करणारे काही विघ्नसंतोषी समाजात नेहमीच असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या उभारणीस शुभारंभ केला तेव्हा त्यांना आडवे आलेले जावळीचे चंद्रराव मोरे काय किंवा केवळ बंडखोर अशी प्रतिमा न राहता स्वराज्याला वैधानिक अधिष्ठानासाठी राज्याभिषेक करायचं ठरवताच आडवे आलेले धर्मद्रोही तत्कालीन कर्मकांडी काय आणि आता महाराजांच्या महास्मारकाला पर्यावरणाची कारणं देत विरोध करू पाहणारे पर्यावरणप्रेमी आणि इतर भंपक काय! अशांपैकी अनेकांना प्रत्यक्षात समाजासाठीही काही करायचं नसतं. फक्त विनाकारण काही खुसपट काढून चांगल्या कामात आडवं येऊन आपलं नकारात्मक अस्तित्व मात्र त्यांना दाखवून द्यायचं असतं.

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासात होऊन गेलेल्या अनेकांपैकी एक असं व्यक्तिमत्त्व असतं तर अशांचा विरोध समजून घेता आला असता. तसंच पर्यावरणाला हानीचं जे कारण पुढे केले जात आहे ती पर्यावरणाची हानी केवळ या महास्मारकामुळे पहिल्यांदाच, सध्याही एकमेव, भविष्यातही होणारच नाही, अशी अभूतपूर्व असती तरीही समजून घेता आलं असतं. मात्र, तसं नाहीय. त्यामुळेच केवळ आपल्यातील कुणी पुढे जातंय म्हणून त्याला साथ देण्याऐवजी घात करू पाहणारे जावळीचे घातकी, गागाभट्टासारख्या काशीच्या विद्वानानं जो राज्याभिषेक केला तोच शास्त्रार्थाच्या मुद्द्यावर नाकारणारे झारीतले स्थानिक कर्मकांडी शुक्राचार्य. या सार्‍यांशी त्याच महाराजांच्या महास्मारकाला विरोध करणार्‍यांची तुलना करावी लागतेय.

महाराजांच्या महास्मारकाचं समर्थन भावनिक मुद्द्यांवर मुळीच नाही करायचे. मुळात महाराजांचा इतिहास भावनेला उभारी देणारा असला, तरीही त्यांचं कर्तृत्व हे काळानुरूप पराक्रमाची स्फूर्ती देणारं व्यवहारी असं आहे. त्यामुळे भावना बाजूला सारून काही मुद्दे मांडतो.

मुळात महास्मारकावर खूप खर्च होणार, हे खरंच आहे. पण, जे काही उभं राहणार आहे ते मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठीच नव्हे तर अवघ्या देशासाठी एक नवं पर्यटनस्थळ होऊ शकतं. आज मुंबईचं महत्त्व उत्पादक शहराकडून सेवा उद्योग शहराचं होऊ लागलंय. आधीच बंगळुरू, पुणे, गुरगाव स्पर्धेत असताना इंटरनेटच्या प्रसारामुळे सेवा उद्योगांची नवी केंद्रे उदयास येऊ शकत असताना भविष्याचा विचार करून योजना आखणं भाग आहे. सर्व सोयी असलेली मुंबई पर्यटकांचं जागतिक आकर्षण केंद्र आहेच. पण, ते आकर्षण आणखी वाढवावं लागेल. महाराजांचं महास्मारक या आकर्षणात मोठी भर घालू शकेल. शहरात मोठं अभयारण्य, पुरातन लेणी एक नाही अनेक, नद्या, किल्ले असलेले एकमेव शहर आहे मुंबई. महाराजांच्या महास्मारकाच्या नव्या महाआकर्षणाच्या निमित्ताने अन्य स्थळांसह एकत्रित पॅकेज करता येईल. त्यात भर घालायला घारापुरी आहेच.

एवढे गड-किल्ले असताना, त्यांची हेळसांड होत असताना आणखी हे स्मारक कशाला? असा तर्कशुद्ध भासणारा प्रश्‍न काही राज ठाकरेंसारखे नेते विचारतात. त्यांना एक छोटासा प्रश्‍न. गड-किल्ले असताना स्मारक कशाला तर मग धड नाशिकच्या लोकांना पुरेसं पाणी देता येत नसताना तुम्ही गोदापार्कवर पैसा का खर्च केला? असं विचारण्यासारखंच. गोदावरीचं दक्षिणेच्या गंगेचं गटार होतंय ती गंगामाउली शुद्ध नाही करायची, शुद्ध जाऊ द्या स्वच्छही नाही ठेवायची आणि कोट्यवधी उधळून गोदापार्कची सजावट करायची. हे तर मुडद्याला शृंगार केल्यासारखंच निर्जीव वाटतं!!

आता पर्यावरणाचाही विचार करूया. मुद्दा योग्यच. पर्यावरणाची हानी होऊच नये! पर्यावरण असलं तर तुम्ही आम्ही सारे असू. नाही तर भविष्यात इतिहासाचं काय करायचंय? असं विचारलं जाऊ शकतं. योग्यच आहे ते. पण खरंच या महास्मारकामुळे पर्यावरणाची अभूतपूर्व अशी महाहानी होणार आहे? मी काहीच होणार नाही असं म्हणतच नाही. मी अभूतपूर्व म्हणतोय. नाही तर साधं घर बांधायचं ठरवलं तरी पर्यावरणाची हानी होतेच होते. अनेक पर्यावरणवाद्यांनी आपल्या निवासी-अनिवासी पत्त्यांचा भूतकाळ तपासावा. काय होतं होतं हो तेथे? मुंबईतील जंगलांची, डोंगरांची कत्तल करून उभारलेलं हिरानंदानी संकुल, खाड्यांची दलदलीची जमीन बुजवून उभारलेलं लोखंडवाला संकुल, सरळ-सरळ समुद्र बुजवून उभारलेले वांद्रे रेक्लेमेशन, नरिमन पॉइंट. राष्ट्रीय उद्यानाच्या जंगल गेल्या तीन दशकात ग्रासत असलेल्या नव्या आलिशान वसाहती. मी पुण्याकडे वळतच नाही. सध्या मुंबईपुरतंच बोलतो.

हे सारं झालं म्हणून महास्मारकामुळे होणारी हानीही खपवून घ्या असंही नाही म्हणत मी!
रयतेच्या काडीलाही हात लावू नका, असं सांगणार्‍या आपल्या शिवछत्रपतींच्या परंपरेला साजेसं नसणार ते! पण जेथे महास्मारक आकारास येणार तेथे काहीच नसतं आणि समुद्रात मधोमध कृत्रिम बेट उभारून स्मारकासाठी समुद्रावर अतिक्रमण केलं जाणार असं आहे का? तर नाही! तेथे मुळात खडकाळ जमीन आहे. तेथे फक्त त्या जमिनीची उंची वाढवणारा भराव टाकून बांधकाम केलं जाणार आहे. माझं आवाहन आहे पर्यावरणवाद्यांना लाटांना अडथळ्यांच्या समस्येवर मार्ग काढावा. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तसं करणं अवघड नसेल. ‘झगा मगा मला बगा’, अशी समाजाच्या भावनांविरोधी भूमिका घेऊन केवळ वाद निर्माण करण्यापेक्षा तोडगा काढा. तुमचा अभ्यास आहे. ज्ञानही असेलच. त्याचा लाभ समाजालाही मिळू द्या. फक्त विरोध करून समस्या दाखवून चालत नसते, तर ती सोडवण्याचा मार्गही दाखवला गेला पाहिजे. अर्थात तो मार्गही व्यावहारिक, अमलात आणणारा असला पाहिजे. मात्र, उगाच स्मारकच नको अशी भूमिका घेऊन पर्यावरणवाद्यांनी हटवादीपणा दाखवला तर तेही एक सामाजिक प्रदूषण ठरेल.

सरकारने मात्र आता हे सारं चालवून घेऊ नये. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महास्मारकाला विरोध करणारे पुढचं पाऊल दुसर्‍या महापुरुषाकडे वळवतील. असेच मुद्दे काढून बाबासाहेबांच्या महास्मारकाला विघ्न आणण्याचा कपटीपणा होईल. शिव आणि भीम दोन्ही महामानवच. महामानवांच्या महास्मारकांना विरोध करण्याचा कपटीपणा हे एक सामाजिक महापापच. कपटीपणा उधळून लावूया. महाराजांचं वैशिष्ट्य असणारा अष्टावधानीपणा आपल्यातही असलाच पाहिजे. अष्टावधानी राहूया!

– तुळशीदास भोईटे
9833794961